Raj Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray : टोल नाक्यावरून राज ठाकरेंचा पुन्हा इशारा; म्हणाले, 'निवडणुकानंतर पुन्हा...'

Pradeep Pendhare

Mumbai News : महायुती सरकारने मुंबईतील पाच टोल नाके बंद करण्याच्या निर्णयावरून श्रेयाचे राजकारण तापलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, हा मास्टरस्ट्रोक आहे. तर राज ठाकरे यांनी हा मनसेच्या आंदोलनाचा पाठपुराव्याचा परिणाम आहे. आता राज ठाकरेंनी यावरून महायुती सरकारला पुन्हा इशारा दिला आहे.

राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बंद केलेल्या टोक नाक्यावर पुन्हा महायुती (Mahayuti) सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, "टोलमाफी ही आमचीच मागणी होती. काँग्रेस सरकार असल्यापासून आम्ही पाठपुरावा करत होतो. सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मनसे सैनिकांनी मोठा लढा दिलाय. लोकांची फसवणूक होत असल्याचं आम्हीच पुढं आणलं. उशिरा का होईना, मोठं यश आलं. टोलमाफीचा घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. उशिरा का होईना, त्यांना या गोष्टी समजल्या. निवडणुकीच्या तोंडावर टोलनाके बंद करायचे आणि परत निवडणुका झाल्यानंतर ते पुन्हा सुरू करायचे, असं चालणार नाही, आणि होऊ देखील देणार नाही".

'सरकारने हा निर्णय घेतला आहे, तो लोकांसाठी आहे. यात लोकांचे समाधान आहे. किती पैसे येतो आहे आणि तो कुठे जात आहे, हे काळायला मार्ग नाही. सगळा व्यवहार कॅशवर होता. किती गाड्या आल्या, गेल्या, कोणाला किती पैसे मिळाले, यावर सर्व राजकीय पक्ष गप्प होते. आता श्रेय घेण्यासाठी येतील, पुढे-मागे. पण यांचा एकदाही संबंध आलेला नाही. जगाला माहिती आहे हे आंदोलन कोणी केले. यात सातत्य ठेवलं. राज ठाकरे एखादं आंदोलन हातात घेतल्यानंतर काय होतं, हे विचारलं जात होतं, त्याचं काय होतं, हे बंद टोलनाके उत्तर आहे', असेही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हंटलं.

सरकारची तिजोरी खाली

राज ठाकरे यांनी मुंबई पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारला टोला लगावला होता. या योजनेमुळे राज्याची तिजोरी खाली झाली असून, जानेवारीत सरकारकडे पगारासाठी पैसे नसतील. या टीकेची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेत जोरदार प्रत्युत्त दिले होते. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. "पाच-पाच, सात-सात हजार रुपये वाटतात, हे शक्य नाही. हे पैसे तुमच्या घरचे आहेत का? हे सरकारचे पैसे आहेत. सरकारकडे आता तिजोरीत पैसे नाहीत. आणि तु्म्ही वाटावाटी करत आहात. हा हप्ता गेल्यानंतर याच्यापुढे सरकार पैसे वाटू शकणार नाही. कंगाल होईल राज्य", अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

मनसे सर्वाधिक जागा लढवणार

'महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष निवडणूक लढतोय, जोरात लढवतोय, जोशात लढवतोय. पक्षाचा जाहिरनामा येणार आहे. त्यावेळी मी सगळ सांगणार आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्षांमध्ये राज्यातील सर्वाधिक जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष लढेल. लढवायच्या म्हणून लढणार नाही. पहिल्यादा लढत नाही. 2009, 2014 मध्ये देखील लढवल्या होत्या', असे राज ठाकरे यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT