Moshi Garbage Depot Accident sarkarnama
महाराष्ट्र

Moshi Garbage Depot Accident : मोशी कचरा डेपो दुर्घटना, तब्बल 84 तासानंतर शोधकार्य थांबले, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांचा मृत्यू

Sarch Operation End Moshi Garbage Depot Accident : बचाव यंत्रणांनी जीवाची बाजी लावत प्रत्येक जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, अखेर नियतीपुढे सारे प्रयत्न अपुरे ठरले, अशी भावना महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केली.

Roshan More

Pune News : मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेनंतर तब्बल 84 तास शोध मोहिम राबवण्यात आली. रविवारी चौथ्या दिवशीच्या शोधमोहीमेत दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या ७ नागरिकांच्या मृत्यूसह इमारतीशेजारील ढिगाऱ्याखाली मध्यरात्री १ वाजता आढळून आलेल्या वामन कसबे (वय ५०, मोशी) या नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या ९ इतकी झाली असून या दुर्घटनेतील सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्याने बचावकार्य थांबविण्यात आले आहे.

८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोशी कचरा डेपो येथे इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीत व इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. घटना घडल्यानंतर लागलीच पाच नागरिक स्वतः बाहेर आले होते.

उर्वरित १८ नागरिकांपैकी ९ नागरिकांना दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. तब्बल ८४ तास अविरत चाललेल्या या बचावमोहीमेतील शोधकार्यामध्ये चौथ्या दिवशी इमारतीत अडकलेल्या ७ आणि इमारतीशेजारील ढिगाऱ्यात अडकलेल्या १ अशा ८ व्यक्तींचा मृत्यू झाला. तर इमारतीत अडकलेल्या भावेश वाणी यांचा ९ जुलै रोजी मृत्यू झाला होता.

बचावकार्याच्या चौथ्या दिवशी अक्षय सावंत (वय ३५, मोशी), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी) तसेच राहुल गायकवाड (वय ३४, मोशी) यांचा मृत्यू झाला.

एक नागरिक इमारतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकून पडल्याने त्याठिकाणी निरंतर शोधमोहीम सुरू होती. अखेर चौथ्या दिवशी मध्यरात्री १ वाजता वामन कसबे (वय ५०, मोशी) यांचा शोध लागला. त्यांना तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तपासणीअंती त्यांना मृत घोषित करण्यात आले.

संपूर्ण बचावकार्यादरम्यान आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून होते. दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये सुरक्षित प्रवेश करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत इमारतीच्या बाजूचा कचऱ्याचा ढीग वेगाने हटविल्यानंतर या इमारतीत प्रवेश करण्याचे सर्व बाजूंनी प्रयत्न करण्यात आले. इमारत अस्थिर असल्याने ती पूर्ण कोसळून आत अडकलेल्या जीवितांना धोका पोहोचू नये, याची काळजी घेऊन बचावकार्य राबविण्यात येत होते.

दुःख शब्दांत व्यक्त करता येत नाही...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे म्हणाले. बचाव यंत्रणांनी जीवाची बाजी लावत प्रत्येक जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, अखेर नियतीपुढे सारे प्रयत्न अपुरे ठरले. आज महापौर म्हणून नव्हे, तर एका सहकाऱ्याच्या आणि माणुसकीच्या नात्याने माझे मन अत्यंत व्यथित झाले आहे. आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जीव गमावलेल्या या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख शब्दांत व्यक्त करता येत नाही. हा अत्यंत वेदनादायी प्रसंग असून दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.

८४ तास सलग बचाव मोहीम...

आयुक्त डाॅ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, मोशी कचरा डेपो येथे घडलेली घटना दुर्दैवी असून यामध्ये ९ नागरिकांचा मृत्यू झाला. मनाला प्रचंड वेदना देणारी ही घटना आहे. यंत्रणांनी तब्बल ८४ तास सलग बचाव मोहीम राबविली. ९ नागरिकांना सुखरुप बाहेर देखील काढले. मात्र ९ नागरिकांचा झालेला अंत मन हेलावून टाकणारा आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT