मुंबईतील पायधुनी परिसरात एका कुटुंबातील चार जणांच्या गूढ मृत्यूने शहरात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला या घटनेमागे कलिंगड कारणीभूत असल्याची चर्चा रंगली होती, मात्र अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या प्राथमिक तपासातून खाद्यपदार्थांमध्ये कोणतेही विषारी घटक आढळले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे.
अधिकाऱ्यांनी मृत कुटुंबाच्या घरातून विविध खाद्यपदार्थांचे नमुने गोळा केले. यात बिर्याणी, कलिंगड, फ्रिजमधील पाणी, कच्चा आणि शिजवलेला भात, चिकन, खजूर तसेच मसाले अशा एकूण 11 नमुन्यांचा समावेश होता. या सर्व नमुन्यांची सखोल तपासणी करण्यात आली. मात्र कोणत्याही नमुन्यात भेसळ किंवा विषारी पदार्थ आढळून न आल्याने तपास अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.
दरम्यान, शवविच्छेदन अहवालाने काही वेगळे संकेत दिले आहेत. मृत व्यक्तींच्या शरीरात मॉर्फिनसारखा वेदनाशामक घटक आढळल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय काही ऊतकांमध्ये हिरवट रंगबदल दिसून आला, जो सामान्यतः विषारी घटकांच्या संपर्कामुळे होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मात्र हे विष नेमके कोणते होते आणि ते शरीरात कसे गेले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
ही घटना 26 एप्रिल रोजी घडली. 40 वर्षीय अब्दुल्ला डोकाडिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी डॉक्टरांना दिलेल्या माहितीनुसार, कलिंगड खाल्ल्यानंतर ते, त्यांची पत्नी नसरीन (35) आणि त्यांच्या दोन मुली आयेशा (16) व झैनब (13) अचानक आजारी पडल्या. काही वेळातच सर्वांची प्रकृती गंभीर झाली आणि अखेरीस चौघांचाही मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस विविध अंगांनी करत आहेत. तसेच कलिना येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळा, अन्न व औषध प्रशासन आणि जेजे रुग्णालय यांच्या सविस्तर अहवालांची प्रतीक्षा सुरू आहे. अंतिम निष्कर्ष टॉक्सिकोलॉजी अहवालानंतरच समोर येणार असून, या मृत्यूमागील खरे कारण काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.