KDMC Election Sarkarnama
महाराष्ट्र

Mahapalika Nivadnuk: मतदानाला 48 तास शिल्लक, डोंबिवलीत राडा; भाजप उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, शिवसेनेच्या दोन उमेदवारांवर गुन्हा

Dombivli Municipal Election 2026: भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यात लोखंडी धारदार हत्याराने वार करण्यात आले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शर्मिला वाळुंज

Dombivli Municipal Election News: महापालिका निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज प्रचार सभा, रॅली आहेत. नेत्यांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गाठी गाठीभेटी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे डोंबिवली पूर्वेतील पॅनल 29 मध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत असून गेल्या दोन दिवसांपासून येथील वातावरण चांगलेच तापले आहे.

भाजपावर पैसे वाटपाचा आरोप शिंदे गटाने केल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही तोच सोमवारी रात्री 11 च्या दरम्यान पुन्हा दोन्ही पक्ष आमनेसामने आले. तुकारामनगर येथे हा राडा झाला. यात भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर (वय 47) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यात लोखंडी धारदार हत्याराने वार करण्यात आले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यामध्ये आणखीन दोन ते तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकारणी डोंबिवली पोलिस ठाण्यात 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील, रवी पाटील यांसह रोशन रवी पाटील, यश नितीन पाटील व इतर 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांची युती असली तरी डोंबिवली पूर्वेतील पॅनल 29 मध्ये मात्र दोन्ही पक्ष आमने-सामने उभे आहेत. येथे मैत्रीपूर्ण लढत दोन्ही पक्षांमध्ये आहे. आतापर्यंत शांततेत सुरू असलेल्या प्रचाराने रविवार पासून मात्र वेगळाच रंग घेतला असून येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी भाजप उमेदवाराच्या प्रचारकांनी प्रभागात प्रचारपत्रकांसोबत पैसे वाटप केल्याचा आरोप या प्रभागातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील, रवी पाटील यांनी केला होता. यामुळे प्रभागातील वातावरण चांगलेच तापले होते ही घटना घडवून 24 तास उलटत नाही, तोच रविवारी रात्री पुन्हा राडा झाला.

भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तुकारामनगर मध्ये ओमनाथ हे चिन्मय वारंगे, हेमंत म्हात्रे, सचिन कार्लेकर, अनुप शेलार, प्रदीप सागवेकर यांच्या सोबत पत्नी आर्या हिच्या प्रचारासाठी गेले होते. तेथून ते घरी जात असताना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील रवी पाटील त्यांची मुले रोशन आणि यश पाटील तसेच अनंत ठाकूर, रवी पुनसकर, प्रसाद घाग यांसह 50 ते 60 जणांचा जमाव आला.

नितीन व रवी पाटील यांनी ओमनाथ यांना शिवीगाळ करत येथे कशासाठी आले आहात अशी विचारणा करत धमकावण्यास सुरुवात केली. नितीन पाटील यांनी त्यांना शिवेगाळ करत धारदार हत्याराने त्यांच्यावर वार करत त्यांना जखमी केले.

रवी पाटील यांनी लोखंडी तळविणे त्यांच्या चेहऱ्यावर वार केले. यात हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ओमनाथ यांच्या सहकाऱ्यांना देखील लाकडी बांबूने व लाथाबुक्क्यानी मारहाण करण्यात आली आहे.

या प्रकरणी रात्री उशिरा रामनगर पोलीस ठाण्यामध्ये आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून देखील अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांनी हे आरोप फेटाळले आहेत. उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच या घटना घडत असल्यामुळे डोंबिवली मधील राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT