

Bhayander: मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शीगेला पोहोचला आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका उडवून दिला आहे. मात्र त्यातही मतदारांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे भाजप व शिवसेनेकडून प्रचारादरम्यान होत असलेली एकमेकांवरील वैयक्तिक चिखलफेक. प्रत्येक जाहीर सभांमधून, चौकसभांमधून परिवहानमंत्री प्रताप सरनाईक व आमदार नरेंद्र मेहता एकमेकांवर उठवत असलेली टीकेची झोड मतदारांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी रहात आहे. त्यामुळे अन्य पक्षांचा प्रचार काहीसा दुर्लक्षित झाला आहे.
मिरा भाईंदरमध्ये भाजप व शिवसेनेत सत्तास्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. भाजपला पुन्हा एकदा महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन करायची आहे. मात्र भाजपच्या या मनसुब्यांना सुरुंग लावण्याचा शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी वैयक्तिक बदनामी या प्रभावी अस्त्रांचा दोन्ही बाजूंकडून मुक्तहस्ताने वापर केला जात आहे. प्रचाराचा प्रकाशझोत मिरा भाईंदरमधील विकास कामांवर कमी आणि एकमेकांचे वस्त्रहरण करण्यावरच केंद्रित झाला आहे.
शिवसेनेकडून नरेंद्र मेहतांना वैयक्तिक लक्ष्य केले जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकित याच पध्दतीने अतिशय नियोजनबद्ध पद्द्धतीने भ्रष्टाचाराचा रावण अशी मेहतांची प्रतीमा मतदारांवर ठसविण्यात आली होते. त्याचा परिणाम म्हणून मेहता त्यावेळी पराभूत झाले होते. आता महापालिका निवडणूकीसाठी देखील हीच पद्धत अवलंबिण्यात येत आहे. शिवसेनेच्या प्रत्येक प्रचार सभेत प्रताप सरनाईक यांच्यासह सर्वच नेत्यांच्या भाषणांचा जास्त वेळ मेहता यांच्यावर कडाडून टीका करण्यातच जात आहे. रविवारी झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या सभेतही एकनाथ शिंदे यांनी मेहता यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
नरेंद्र मेहता देखील वैयक्तिक टीकेला वैयक्तिक टीकेनेच प्रत्युत्तर देत आहेत. गेल्या अडीच वर्षात महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरु होती. या काळात मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना हाताशी धरुन मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा मुद्दा मेहता प्रचारात उपस्थित करत आहेत व महापालिकेत सत्तेत येताच या भ्रष्टाचाराची चौकशी करणार असल्याचे ते सांगत आहेत. २०१९ मध्ये शिवसेना भाजप युती असतानाही विधानसभा निवडणुकित व त्यानंतरही शिवसेनेकडून कायम विश्वासघात करण्यात येत असल्याचे ते आवर्जून सांगत आहेत.
दोन्ही पक्षांची एकमेकांवर सुरु असलेल्या या चिखलफेकीचीच मतदारांमध्ये सर्वाधिक चर्चा सुरु आहे. परिणामी काँग्रेस, ठाकरे गट, मनसे या प्रमुख पक्षांसह अन्य पक्षांचा प्रचार मात्र दुर्लक्षित झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.