Maharashtra Municipal Elections : महाराष्ट्रातील जाहीर नगरपालिका निवडणूक कार्यक्रमाला काही ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे. याचिका आणि उमेदवारांचा मृत्यू यामुळे मतदान प्रक्रिया तत्काळ राबविणे शक्य नसल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात बारामती, सोलापूर, धुळे, नाशिक आणि बीड या जिल्ह्यांमधील काही नगरपालिकांच्या प्रभागांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती नगरपरिषदेच्या संदर्भात जिल्हा न्यायालयात दाखल याचिकेवरील आदेशानुसार, प्रभाग क्रमांक 17 'अ' आणि प्रभाग 13 'ब' या दोन विभागांमधील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. न्यायालयीन आणि प्रशासकीय स्तरावरील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच या प्रभागांचे मतदान होणार आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगराध्यक्षपदाची निवडणुकही दाखल याचिकांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 2, नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 10 आणि बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 11 या तिन्ही ठिकाणी उमेदवाराचा मृत्यू झाल्याने एकूण 6 जागांवरील निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने तत्काळ स्थगित केली आहे. उमेदवारांच्या नव्या नामनिर्देशन प्रक्रियेनंतरच पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल.
बारामती नगरपरीषदेमधील प्रभाग १७ अ , तसेच प्रभाग १३ ‘ब’मधील उमेदवारांचे अर्ज जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्वीकारले. या दोन जागांसाठी २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारले आहेत. या दोन नामनिर्देशन पत्रांबाबत पुढील प्रक्रियेविषयी (छाननी, उमेदवारी माघारी घेणे, आदी) राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. उमेदवारी अर्ज वेळेत न आल्याने सतीश फाळके व अविनाश गायकवाड या दोन उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नव्हते. त्या विरोधात त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या दोन्ही उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार २६ नोव्हेंबर रोजी दोघांनी अर्ज दाखल केल्याने आता या दोन्ही प्रभागातील निवडणूक प्रक्रीया पुढे जाणार आहे. या दोन जागा वगळून नगराध्यक्ष व इतर सर्व जागांसाठीचा उर्वरित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे. मतमोजणीदेखील या दोन जागा वगळता ३ डिसेंबर रोजी होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.