Nilesh Lanke  Sarkarnama
महाराष्ट्र

Nagar News: निलेश लंकेंच्या फराळाला निवडणुकीचा 'वास'; लोकसभेसाठी मोर्चबांधणी

Nilesh Lanke : अनेकांना निलेश लंके प्रतिष्ठानकडून फराळ कार्यक्रमाचे अगत्याचे आमंत्रण दिले आहे.

राजेंद्र त्रिमुखे

Nagar: नगर जिल्ह्यातील पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते यंदाच्या नियोजित दिवाळी फराळाच्या कार्यक्रमामुळे.

शक्यतो आमदार वा कुठलाही लोकप्रतिनिधी असे कार्यक्रम आपण लोकप्रतिनिधीत्व करत असलेल्या कार्यक्षेत्रासाठीच आयोजित करत असतो. मात्र निलेश लंके यांनी केवळ पारनेर पुरता दिवाळी फराळाचा कार्यक्रम न ठेवता नगर दक्षिण लोकसभा असा विस्तारित आयोजित केल्याने लंकेंची पुढची रणनीती स्पष्ट करणारा असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

निलेश लंके प्रतिष्ठान आणि लंके परिवाराच्या वतीने येत्या 16 नोव्हेंबर रोजी लंके यांच्या हंगा गावात दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चर्चेतल्या खात्रीशीर माहिती नुसार नगर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व सात तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, जिल्हा परिषद-पंचायत समिती-ग्रामपंचायत सदस्य, सर्व सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे पदाधिकारी-सदस्य, विविध समित्यांचे पदाधिकारी, गावा-गावातील प्रतिष्ठित व्यक्ती अशा अनेकांना निलेश लंके प्रतिष्ठानच्या दोनशेवर सदस्यांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन 16 तारखेच्या फराळ कार्यक्रमाचे अगत्याचे आमंत्रण दिले गेले आहे.

गेल्या दोन-अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस कडून खुद्द शरद पवार यांनी त्यांना येणाऱ्या 2024 ची लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे सांगितल्याचे बोलले जाते. अनेकदा त्यांनी भाजप खासदार सुजय विखे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात उघडपणे टीका-टिपण्णी केली आहे.

अडीच वर्षांपुर्वीच साहेबांनी तसेच दादांनी लंकेंना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याबाबत मागेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दुजोरा दिलेला आहे. मात्र दरम्यान नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि लंके अजित पवार यांच्या गटात गेले. अशा बदलत्या राजकीय परस्थितीत लंके यांना लोकसभा लढवणार का या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर लंकेनी अजितदादा जो आदेश देतील त्या प्रमाणे निर्णय घेऊ असे सांगत आपल्याला लोकसभेचे दरवाजे उघडे असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

लंके अजित पवार गटात असले तरी त्यांचा स्नेह मोठ्या साहेबांशी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी आजही कायम आहे. त्यामुळे लंके यांनी अडीच वर्षांपासून केलेली तयारी आणि पवार परिवाराचा वरदहस्त मानला जात असल्याने लंकेंनी आपली लोकसभेची तयारी दरम्यानच्या काळात कायम ठेवल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून यंदा दिवाळी फराळाचा कार्यक्रम संपूर्ण लोकसभा कार्यक्षेत्र डोळ्यासमोर ठेवून नगर दक्षिणेतल्या सर्व पक्षीय नेते,पदाधिकारी, सरपंच आदींना फराळाचे आग्रहाचे निमंत्रण धाडण्यात आले आहे. त्यामुळे लंकेंच्या यंदाच्या दिवाळी फराळाला निश्चितच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा 'वास'असणार असल्याचेच बोलले जात आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT