Nagpur News : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार करून महायुती सरकारने येत्या दोन दिवसांत खाते वाटप जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही खाते वाटपाचे काहीच ठरल्याचे दिसत नाही. मंत्रिमंडळात समावेश नसल्याने अनेक ज्येष्ठ नेते व आमदार नाराज आहेत. यातच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनाला दांडी मारली आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपावरून नाराजी असल्याने दोन्ही उपमुख्यमंत्री तातडीने दिल्लीला गेले असल्याची चर्चा नागपुरात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर एकनाथ शिंदे यांनी आम्ही कोणीच नाराज नाही, सर्वकाही सुरळीत सुरू असल्याचा दावा केला होता. ज्या प्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला अडीच वर्षे साथ दिली त्याच प्रमाणे आपणही त्यांच्यासोबत भक्काम उभे राहणार असल्याचेही जाहीर केले होते.
अजित पवार यांनी आपल्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला जाहीर केला. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या कामांचे ऑडिट करून फेरबदल केला जाईल, असे सांगितले. हे सर्व सोपस्कार पाडल्यानंतरही कोणाचीच नाराजी दूर झाल्याचे दिसत नाही, उलट वाढत चालली आहे. नाराज असलेले छगन भुजबळ अधिवेशनाला हजेरी लावून निघून गेले.
मुनगंटीवार दोन दिवसांपासून अधिवेशनात फिरकले नाही. तानाजी सावंतही रुसले आहेत. भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेच्या उपनेतेपद आणि विदर्भाचे समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. अधिवेशनात उत्तर द्यायला संबंधित खात्याचे मंत्री नसताना आज दोन्ही उपमुख्यमंत्री कामकाजात उपस्थित नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकट्याने विरोधकांचा हल्ला परतवला.
फडणवीस हे सुमारे तासभर विधानसभेत बसून होते. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री गेले कुठे, याचीच चर्चा सध्या रंगली आहे. अजित पवार आणि शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी ते दिल्लीला गेले असल्याचे सांगितले. खातेवाटपावरून ते नाराज आहेत. ते या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते. त्यानंतरच खातेवाटप जाहीर केले जाईल, असे सांगण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.