Nana Patole Sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole : "शिवद्रोही सरकारला चलेजावचा नारा" – नाना पटोले

सरकारनामा ब्यूरो

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपतींचा पुतळा, जो आपल्या सन्मानाचा प्रतीक आहे, तो कोसळला. “या घटनेने केवळ आपल्या महाराजांचा अपमान झालेला नाही, तर महाराष्ट्राच्या आत्म्यालाच धक्का बसला आहे. हा अपमान आपण कदापि सहन करणार नाही. याच्या मुळाशी भ्रष्टाचार आहे, आणि या शिवद्रोही सरकारला आम्ही सत्तेवरून घालवणारच,” असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये करण्यात आले होते, आणि आज, अवघ्या ९ महिन्यांत तो कोसळला. हा पुतळा केवळ मुसळधार पावसामुळे किंवा वाऱ्यामुळे कोसळला नाही, तर हा त्या भ्रष्टाचाराच्या ढिगाऱ्याखाली गडगडला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला पुतळा इतक्या लवकर का कोसळला? त्याला जबाबदार कोण? हा पुतळा उभारणाऱ्या ठेकेदारांची निवड करताना त्याचा अनुभव का तपासला गेला नाही? या शिवद्रोहाची जबाबदारी कोण घेणार?

आज महाराष्ट्रात अशा भ्रष्टाचारी सरकारचा कारभार सुरू आहे. ते फक्त छत्रपतींच्या नावाचा उपयोग करून आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. “पंतप्रधान मोदी असोत किंवा मुख्यमंत्री शिंदे असोत, त्यांनी शिवरायांच्या नावाने मते मागितली, पण त्यांचे आदर्श कधीच पाळले नाहीत. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी माफी मागितली, पण त्यांच्या माफीमध्ये अहंकार होता. ही माफी केवळ निवडणुकींसाठी आहे. महाराष्ट्रातील जनतेने ही माफी स्वीकारली नाही, आणि मीही स्वीकारणार नाही ,” असे पटोले यांनी ठणकावून सांगितले.

आजचा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर, आणि छत्रपतींच्या विचारांचा आहे. आम्ही या शिवद्रोही सरकारला घालवूनच थांबणार. हे सरकार, ज्याने छत्रपतींच्या नावाचा वापर करून जनतेला फसवले, ते आता स्वत:च्याच भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकले आहेत, अशा शब्दांत पटोले यांनी घणाघात केला आहे.

आम्ही कधीही शिवरायांचा अपमान सहन करणार नाही. हा फक्त एक पुतळा नाही, हे आमच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. हा लढा फक्त पुतळ्यासाठी नाही, हा लढा महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आहे. आम्ही या सरकारला हटवणार, आणि महाराष्ट्रात छत्रपतींच्या आदर्शांवर आधारित राज्य आणणार. फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रात पुन्हा प्रस्थापित करणार. तुम्ही सर्वांनी या लढाईत आमच्यासोबत राहावे, आणि हे शिवद्रोही सरकार सत्तेतून हाकलून द्यावे, हीच माझी विनंती आहे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

या शिवद्रोही सरकारने छत्रपतींच्या पुतळ्याची देखील कदर केली नाही, तर या भ्रष्टाचारी नेत्यांकडून महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी काय अपेक्षा ठेवावी? आम्ही यांना सत्तेतून हाकलून देणार, हे सरकार केवळ खोटी आश्वासने देऊन सत्तेत आले आहे, आणि आता ते लोकांची फसवणूक करत आहेत. आम्ही फक्त याच पुतळ्यासाठी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी लढणार आहोत.

हा लढा फक्त एका पक्षाचा नाही, हा लढा महाराष्ट्राच्या आत्म्याचा आहे, अशा शब्दांत पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT