Mahayuti News : सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीत विविध विषयांवरून धुसफूस सुरू आहे, हे वेगळे सांगण्याची गरज राहिलेली नाही. भाजपला 132 जागा मिळालेल्या आहेत, काही अपक्षांनाही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप निर्धास्त आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपमुळेच महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले, असा त्या पक्षाचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे महायुतीतील एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या पक्षांना भाजपच्या मागे फरफटत जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, हे वेळोवेळी समोर आलेले आहे.
ताजा विषय आहे नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा. नाशिकसह रायगडच्या पालकमंत्रिपदावरून तिढा निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. रायगड राष्ट्रवादी काँग्रेसला तर नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपला देण्यात आले होते. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांवर शिवसेनेने मजबूत दावा केला होता. त्यामुळे शिवसेनेत नाराजी निर्माण झाली होती. हे पाहता, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या निवडीला 24 तासांच्या आथ स्थगिती देण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ओढवली होती.
महायुतीत अजितदादा पवार यांचा प्रवेश झाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हिरमोड झाला. अजितदादांमुळे आपल्यावर अन्याय झाला, अशी शिवसेनेच्या नेत्यांची भावना अद्यापही कायम आहे. मात्र भाजपकडून त्याला फारसे महत्व दिले जात नाही, हे नाशिक पालकमंत्रिपदाच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा समोर आले आहे. नाशिकचा पालकमंत्री भाजपचाच राहील, असा संदेश दिल्लीतील भाजपच्या श्रेष्ठींनी एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आता दिला आहे. रायगडचा निर्णय शिंदे, पवार यांनी घ्यावा, असेही त्यांना कळवण्यात आले आहे.
हा निर्णय मान्य करण्याशिवाय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोर एखादा पर्याय आहे का? या प्रश्नाचे उत्तर, नाही असे आहे. भाजपश्रेष्ठींचा निर्णय शिंदे यांना मान्य करावाच लागणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद आपल्यालाच मिळावे, अशी अपेक्षा शिंदे यांना होती, मात्र ती पूर्ण झाली नाही. त्यावरून रुसवेफुगवे झाले, एकनाथ शिंदे हे आपल्या मूळगावी दरे येथे निघून गेले. ते 3-4 दिवस तिकडेच राहिले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. त्यांचा दुसरा हट्टही पुरवला गेला नाही, त्यांच्या पक्षाला गृहमंत्रिपद मिळाले नाही.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील दोन्ही पक्ष अजिबात हालचाल करू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत हे 20 आमदारांसह भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा मध्यंतरी सुरू करण्यात आली होती. या चर्चेद्वारे एकनाथ शिंदे यांना एकप्रकारे इशाराच देण्यात आला आहे. धनंजय मुंडे आणि आता माणिकराव कोकाटे या दोन मंत्र्यांमुळे अजितदादा पवार बॅकफूटवर गेले आहेत. ही प्रकरणे झाली नसती तरी अजितदादांनी जास्त हालचाल केलीच नसती. आता तर भाजपचे एेकण्याशिवाय त्यांच्याकडे अन्य कोणताही पर्याय दिसत नाही.
कोणतेही पक्ष सत्तेसाठी एकत्र येत असतात. महायुतीतील पक्षही सत्तेसाठी एकत्र आले आहेत, अन्यथा महाविकास आघाडीत असताना अर्थमंत्री अजितदादा पवार निधी देत नाहीत, असे एक कारण देत शिवसेनेतून फुटलेली शिंदेंची शिवसेना आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत राहिली असती का? समजा एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर आपले सर्व आमदार निर्णय मान्य करतील का, आपल्यासोबत सरकारमधून बाहेर पडतील का?, अशी भीती या दोघांना नक्कीच वाटत असणार.
''मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला पहिल्याच दिवशी दम दिला होता. जास्त मस्ती कराल तर घरी जाल,'' अशा शब्दांत सुनावले होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हटले आहे. मंत्र्यांचे 'पीएस', 'ओएसडी' मुख्यमंत्री फडणवीस हेच ठरवतात, असेही कोकाटे म्हणाले होते. मित्रपक्षांचे मंत्री किती हतबल आहेत, हे कोकाटे यांना याद्वारे सांगायचे होते. याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्याने घेतले नाही. असे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात, असे सांगून ते मोकळे झाले.
अजितदादा पवार महायुतीत बऱ्यापैकी 'अॅडजस्ट' झालेले आहेत, पण शिंदेंचे तसे दिसत नाही. मवाळ शिवसेनाप्रमुख शिवसैनिकांना आवडत नाही, याची कल्पना शिंदेंना आहे. त्यामुळे ते नाराज असल्याचे, आक्रमक असल्याचे वरवर दाखवतील, मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. अब्दुल सत्तार पणनमंत्री असतानाच्या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली आहे. ही कोंडी कमी की काय म्हणून शिंदेंचे मंत्रीही आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांना स्थगिती देत आहेत. अशा या एकंदर परिस्थितीत महायुतीतील दोन्ही पक्षांना भाजपच्या मागे फरफटत जाण्याशिवाय पर्याय राहिलेला दिसत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.