
Swargate rape case : स्वारगेट बस स्थानकात तरूणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न आहे. रिकाम्या शिवशाही बसमध्ये पहाटे दत्तात्रय गाडे नराधमाने हे कृत्य केले. त्यानंतर आता आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचेही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला पकडून देणाऱ्याला एक लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, दत्तात्रय गाडे याचा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वीही पुणे (Pune) आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तो एका बड्या पुढ्याऱ्याचा कार्यकर्ता म्हणून वावरत होता. इतकंच काय तर तो त्याच्या गावच्या तंटामुक्त समिती सदस्य पदासाठीच्या निवडणुकीलाही उभा राहिला होता.
दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी. गुणाट ग्रामस्थांच्या माहितीनुसार, त्याची कौटुंबिक परिस्थिती बेताची. गावात पक्क्या बांधकामातील पत्र्याचे छत असलेले साधे घर आहे. घरी आई-वडील, एक भाऊ, पत्नी आणि लहान मुले असे राहतात. आई आणि वडील वडिलोपार्जित तीन एकर शेत जमीन कसतात. त्याचवेळी दत्तात्रय गाडे मात्र पहिल्यापासून काहीही कामधंदा करत नाही. दिवसभर टारगट मुलांसोबत उनाडक्या करत फिरत असतो. यातूनच वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या माध्यमातून झटपट पैसे कमावतो.
यातूनच 2019 मध्ये दत्ताने कर्ज काढून एक चारचाकी कार विकत घेतली. या गाडीतून तो पुणे-अहिल्यानगर मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करायचा. या प्रवासामध्ये कधी तो अंगावर जास्त दागिने असलेल्या एकट्या दुकट्या वृद्ध महिलेला लिफ्ट द्यायचा. संधी साधून कडे घाटात किंवा एखाद्या निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवायचा आणि त्यांच्या अंगावरील दागिने काढून घ्यायचा. पण एका महिलेच्या सतर्कतेमुळे त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती.
त्यावेळी जबरी लूट, दरोडा असे गुन्हे उघडकीस आले होते, शिवाय सुमारे 12 तोळे सोने जप्त केले होते. यातीलच एका गुन्ह्यात चार वर्षापूर्वी त्याला पाच-सहा महिन्यांची शिक्षा झाली आहे. दत्तात्रय गाडेवर आतापर्यंत शिक्रापूर येथे दोन, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, केडगाव आणि कोतवाली पोलिस ठाण्यांत प्रत्येकी एक असे गुन्हे दाखल आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तो राष्ट्रवादीचे (NCP) आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा कार्यकर्ता म्हणून वावरायचा. इतकंच काय तर गुणाट गावच्या तंटामुक्त समितीत सदस्य पदासाठीच्या निवडणुकीत उभा राहिला होता. परंतु, त्याचा पराभव झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.