NCP leader Nawab Malik
NCP leader Nawab Malik Sarkarnama
महाराष्ट्र

मलिक आता वाझे-परमबीरांच्या मागे : 'अँटिलिया'बाबत धक्कादायक माहिती बाहेर येणार...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एनसीबीचे अधिकारी 'समीर वानखेडे' प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आता 'बडतर्फ सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंगांच्या' (Parambir Singh) मागे लागले आहेत. तसेच अँटिलिया स्फोटक प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचा दावाही मलिक यांनी केला. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे काहीसे थंड बस्त्यात गेलेले 'अँटिलिया' प्रकरण (antilia bomb scare) आता पुन्हा चर्चेत आले आहे.

नवाब मलिक म्हणाले, अँटिलियाबाहेर स्फोटके ठेवण्याचे कारस्थान परमबीर सिंह आणि सचिन वाझेनेच रचले होते. त्यांनीच एक फेक पासपोर्ट तयार केला. विधानसभा अधिवेशनावेळी सरकारला वारंवार चुकीची माहिती पुरविण्यात येत होती. पुढे परमबीर सिंहांची होमगार्डला बदली केल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. आता हे प्रकरण चांदीवाल आयोगासमोर आहे. सगळा लढा न्यायालयीन आहे. पण हे संपुर्ण प्रकरण राजकीय हेतूने रचण्यात आले होते असेही आरोप मलिक यांनी केला.

फेक पासपोर्टवर बोलताना मलिक म्हणाले, या प्लॅनिंगमध्ये वाझे आणि परमबीर सिंगांनी एक फेक पासपोर्ट तयार केला. त्यावर पाकिस्तान 'एक्झिट' आणि 'इंटर'चा प्लॅनही त्यांनी केला होता. जर मनसुख हिरेनची हत्या झाली नसती तर तो पोलिसांच्या स्वाधीन झाला असता. त्यावेळी त्याचा फेक एन्काउंटर करण्याचा प्लॅन त्या दोघांनीही केला होता. सचिन वाझेच्या घरातून एनआयएला फेक पासपोर्ट मिळाला आहे. त्यांनी याबाबतची माहिती उघड करावी अशीही मागणी मलिक यांनी केली. तसेच यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचा दावाही त्यांनी केली.

मलिक यांनी यावेळी बोलताना केंद्रावर देखील टीका केली. ते म्हणाले, आज ठरवले आणि तुरुंगात टाकायचे अशी आमची केंद्रासारखी भूमिका नाही. परमबीर सिंह यांच्यावर ३ ठाण्यात आणि २ मुंबईत अशा एकूण ५ तक्रारी दाखल आहेत. पोलिसांचे पथक त्यांची चौकशी करत आहे. या चौकशीमध्ये जे काही आहे ते समोर येईल. तसेच ६ डिसेंबरपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण आहे. परंतु न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाईही होईल, असे मलिक म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT