मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर (Mamata Banerjee Mumbai Visit) आहेत. नुकताच दिल्ली दौरा आटोपून त्या महाराष्ट्रात परतल्या आहेत. त्यानंतर त्या आता मुंबईत आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कन्येच्या रिसेपशनला उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्या (१ डिसेंबर) दुपारी १ वाजता त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना 'सिल्वर ओक'वर भेटणार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही त्या भेटणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) त्यांची भेट होणार नाही.
तृणमूल काँग्रेसच्या सध्याच्या राजकीय हालचालींमुळे ममता दीदींचा हा महाराष्ट्र दौरा महत्वाचा मानला जात आहे. पश्चिम बंगलमधील सलग तिसऱ्या मोठ्या विजयानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसची ताकद पुरेशी नसल्याची टीकाही अनेकदा स्वतः ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यामुळेच आता ममता यांना राष्ट्रीय राजकारण खुणावत असल्याचे स्पष्ट आहे.
ममता बॅनर्जी यांनी सध्या पक्षाच्या विस्तारवाढीचे धोरण स्विकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर तृणमूलने गोव्यात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी लुईझिन फालेरो यांच्यासारखे गोव्यातील अनेक मोठ्या नेत्यांना तृणमूलमध्ये आणले आहे. त्रिपुरावरही पक्षाची नजर आहे. दूसरीकडे राष्ट्रीय पातळीवर तयारी म्हणून मागच्या काही काळात किर्ती आझाद यांच्यासह हरियाणामधील नेत्यांना त्यांनी पक्षात आणले आहे.
ममता यांनी नुकतेच मेघालयमध्येही काँग्रेसवर पॉलिटिकल स्ट्राईक केला आहे. तिथल्या माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह काँग्रेसच्या १८ पैकी १२ आमदारांनी पक्षाला सोटचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणूक न लढवताही तृणमूल काँग्रेस मेघालयमध्ये विरोधी पक्ष बनला आहे. ६० जागांच्या विधानसभेत नॅशनल पिपल्स पार्टीच्या नेतृत्वात ४० जागांसह एनडीएचे सरकार आहे. या सगळ्या घडामोडीनंतर ममता बॅनर्जी आता महाराष्ट्रात येत आहेत.
महाराष्ट्रातही आगामी काळात मुंबईसह जवळपास दिड डझन महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय राजकाणात उभे राहण्यासाठी ममता महाराष्ट्रात जमीन तयार करत आहेत का? असा सवाल त्यांच्या आताच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन विचारला जात आहे. तसेच महाराष्ट्रात ताकद उभी करुन राष्ट्रीय राजकारण करण्याची त्यांची रणनिती असल्याचेही बोलले जात आहे. मात्र यातील नेमकी कोणती गोष्ट ममता या दौऱ्यातुन साधू इच्छितात हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पुढील काही दिवसात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.