zilla parishad Politics; ravindra chavan meets sunil tatkare sarkarnama
महाराष्ट्र

ncp bjp alliance : सुनील तटकरे-रवींद्र चव्हाणांची भेट : रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर ZP ची समीकरण बदलणार? राष्ट्रवादी भाजपला सत्तेत बसवणार?

ravindra chavan meets sunil tatkare Over zilla parishad Politics : राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निकालात महायुतीने मुसंडी मारली असून आता सत्ता केंद्रात राष्ट्रवादी भाजपला सत्तेत बसवणार असे चित्र निर्माण झाले आहे.

Aslam Shanedivan

  1. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालानंतर काही ठिकाणी अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही.

  2. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे.

  3. रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी भाजपला सत्तेत पाठिंबा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

maharashtra zilla parishad politics News : राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निकाल नुकताच लागला असून अनेक ठिकाणी महायुतीची सत्ता आली आहे. मात्र काही ठिकाणी अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला वगळून सत्ता स्थापन करत असल्याची चर्चांना ऊत आला होता. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर आता अनेक ठिकाणी एकत्र जाण्यासंदर्भात चर्चा केल्याचे तटकरे यांनी सांगितले आहे. यामुळे आता रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेतील समीकरण बदलणार असून राष्ट्रवादी भाजपला सत्तेत बसवणार असे चित्र स्पष्ट झाले आहे.

रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेत सत्तेचा पेच कायम आहे. महाविकास आघाडीला रोखायचे असेल तर महायुती म्हणून भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकसंघ असायला हवी. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपने अनेक ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतले नाही. तर कुठे शिवसेनेशीही फारक घेतली. पण आता हेच मित्र पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत असून सत्ता स्थापनेआधी ज्यांच्याशी फारकत घेतली त्यांचाच हात मागण्याची वेळ भाजपवर आली आहे. तर भाजपने घेतेलल्या आडमूठ्या भूमिकेवरून दुखावलेल्या राष्ट्रवादीसह शिवसेनेनं हात मिळवणी करत भाजपविरोधात सत्ता स्थापन करण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे.

याच अनुषंगाने आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil tatkare) यांची मुंबईतील पक्ष कार्यालयात जाऊन भेट घेतली. तसेच सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली. यानंतर या भेटीत कोणती चर्चा झाली याची माहिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते म्हणाले, आमची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली, त्यानंतर आज रवींद्र चव्हाण भेटण्यास आले होते. जिल्हा परिषद निवडणूक झाली असून अनेक ठिकाणी एकत्र जाण्यासंदर्भात चर्चा झाली. पुढील काळात अनेक ठिकाणी आम्ही एकत्र सत्ता स्थापन करणार आहोत. आमच्या आमदारांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही. पुढील काळात पक्ष संघटना काम करण्याबाबतही आमच्यात चर्चा झाली.

रायगडात राष्ट्रवादी-भाजप एकत्र

दरम्यान कोकणातील रायगडसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेत सत्ता संघर्ष टोकाला पोहचला आहे. येथे रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या ५९ जागांपैकी सर्वाधिक २१ उमेदवार शिवसेनेने जिंकल्या आहेत. तरीदेखील सध्याची स्थिती ही शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवणारी तयार झाली आहे. येथे भाजप १५, राष्ट्रवादी १६ असे संख्याबळ झाले असून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी-भाजपची सत्ता येईल असा दावा तटकरे यांनी केला होता. आजच्या भेटीनंतर आता रायगडात भाजप-राष्ट्रवादीची सत्ता येणार हे निश्चित झाले असून सर्वाधिक जागा जिंकणारी शिवसेना सर्वाधिक जागा जिंकूनही तहात हरल्याची चर्चा रंगली आहे.

सांगलीतही महायुती एकत्र

सांगलीमध्ये युतीतील पक्षांचे मिळून ३१ सदस्य विजयी झाले असून भाजपचे सर्वाधिक १८ सदस्य आहेत. तर विरोधक असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे १८, काँग्रेस ११ व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचक एक जागा असे आघाडीचे संख्याबळ ३० होते. यावरूनच आमदार जयंत पाटील यांनी गुप्तपणे बैठका घेऊन मोर्चेबांधणी सुरु केली होती. चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेवर महायुतीचाच अध्यक्ष होईल असे विधान करत जयंत पाटील यांच्या मोर्चेबांधणीला सुरूंग लावला.

त्यांनी महायुती म्हणून एकत्र येण्याचं ठरलं असून आता येथे महायुतीची सत्ता येणार असा ठाम दावा केला. तसेच थेट मुख्यमंत्र्यांचे नाव घेत ते लोहचुंबक असून तेथे गेल्यावर सारे त्यांचे म्हणणे मान्य करतात. ते देखील योग्य मार्गदर्शन करतात. दोन गोष्टी तुम्ही मागे, तर दोन गोष्टी आम्ही पुढे असा मार्ग काढतात. मतभेद नाहीत असे नाही, ते आहेत; पण त्यातून मार्ग काढू असे म्हटले होते. तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर लगेच तटकरे आणि चव्हाण यांची भेट झाली. ज्यात एकत्र जाण्यावर ठाम निर्णय झाला आहे.

कोल्हापुरात हसन मुश्रीफांचा निर्धार

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीने मॅजिक फिगर गाठली असून तब्येत 51 जागांवर विजय मिळवला आहे. 68 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत केवळ 17 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली असल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा पडत नाही जवळपास निश्चित झाले आहे. पण महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 20 जागा घेतल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्याने अध्यक्ष आमचाच होईल अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी घेतली. मात्र या भूमिकेला आता भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून विरोध झाला होता. त्यानंतर 15 जागा मिळवणारा काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? अशी जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

महायुतीत कमालीची चुरस

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही भाजपला इतर दोन्ही मित्र पक्षांशी युती न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय अंगलट आला. येथे जिल्हा परिषदेची सूत्रे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे जाण्याची चिन्हे आहेत, तशा हालचालीही होताना दिसत आहेत. याबाबत पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी स्पष्ट संकेत दिले होते. जिल्हा परिषदेच्या ६५ जागांपैकी सर्वाधिक २७ जागा ह्या भाजपने जिंकल्या असून शिवसेना १५ आणि राष्ट्रवादीच्या २० जागा निवडून आल्या आहेत.

तर यावेळी दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आघाडी केली होती. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. तर भाजपला वगळून सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा झाल्याचे समोर आले होते. पण आता मुंबईत जोरदार हालचाली झाल्या असून राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र सत्ता स्थापन करेल यावर चर्चा झाली आहे. यामुळे तसे झाल्यास भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन होईल, अशी शक्यता आहे.

FAQs :

1. रवींद्र चव्हाण आणि सुनिल तटकरे यांची भेट का महत्त्वाची आहे?
या भेटीनंतर राष्ट्रवादी-भाजप एकत्र सत्तास्थापना करतील का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

2. कोणत्या जिल्ह्यांमध्ये समीकरण बदलण्याची शक्यता आहे?
रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हा परिषदांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

3. सत्ता स्थापन उशिरा का होत आहे?
सभापती आणि इतर पदांवर एकमत न झाल्याने काही ठिकाणी प्रक्रिया रखडली आहे.

4. राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार का?
तटकरे यांनी एकत्र जाण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले असून अंतिम निर्णय लवकर स्पष्ट होईल.

5. याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नव्या आघाड्यांमुळे भविष्यातील विधानसभा आणि लोकसभा राजकारणावरही परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT