Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवारांचं ठरलं; शिंदे-फडणवीसांची साथ सोडणार, विधानसभेनंतर स्वबळावर लढणार

Rajanand More

Pune : राज्यातील सत्तेत अजित पवारांना सामावून घेतल्यानेच भाजपला फटका बसल्याचा ठपका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’सह भाजपशी संबंधित काही साप्ताहिकांमधून ठेवला जात आहे. त्यामुळे महायुतीतील अजित पवारांच्या सहभागाबद्दल संशय निर्माण केला जात असतानाच आता त्यांनी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. अर्थात भाजप आणि शिवसेनेची साथ सोडणार आणि स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे खुद्द अजित पवारांनी पुण्यात स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधानसभेनंतर महायुतीत फाटाफूट निश्चित आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत असेल का, याची चर्चा असतानाच विधानसभा निवडणुका महायुतीत राहूनच लढायचे, यावर अजित पवारांचे समर्थक आमदार ठाम आहेत. ही निवडणूक संपल्यानंतर अजितदादा स्वबळ दाखवणार असल्याने त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांची परीक्षा असेल.

काय म्हणाले आहेत अजितदादा?

पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था या आपआपल्या पक्षाने आपआपल्या ताकदीवर लढवायच्या आहेत. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या प्रभागात, वॉर्डात, आपआपल्या गटात, गणात काम व्यवस्थितपणे करावे, असे आवाहन अजितदादांनी यावेळी केले.

अजित पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकट्याच्या जोरावर लढणार असल्याचे जाहीर केल्याने त्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवरही होणार का, हेही पाहणे महत्वाचे असेल. त्यामुळे अजितदादांची ही घोषणा महायुतीमध्ये कोणते नवे वादळ उठवणार याबाबतही आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अजित पवारांना सोबत घेतलेल्या लोकसभेत फटका बसल्याचा थेट दावा ऑर्गनायझरमधून करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीत नाराजी निर्माण झाली होती. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांवर त्यावर स्पष्टीकरणही दिले. विरोधकांच्या फेक नरेटिव्हवर या नेत्यांनी ठपका ठेवत लोकसभेतील पराभवाचे कारण सांगितले.

लोकसभेत पराभवानंतर विधानसभेला महायुती ताकदीने सामोरे जाणार, हे आता स्पष्ट आहे. पण स्थानिक स्वरास्थ संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा अजितदादांनी एवढ्या लवकर का केली, याबाबतही आता चर्चा रंगल्या आहेत. या निवडणुका कधी होणार, याची अजून पुसटशी कल्पनाही नाही. पण दादांनी केलेल्या घाईमुळे ही नेमकी कशाची तयारी सुरू आहे, याचे राजकीय वर्तूळात अनेक अर्थ काढले जाऊ शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT