NCP Ajit Pawar Politics : Sharad Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Hearing : राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा? आता २० नोव्हेंबरपासून निवडणूक आयोगासमोर नियमित सुनावणी!

Mayur Ratnaparkhe

Nationalist Congress Party News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा, याबाबत आता २० नोव्हेंबरपासून केंद्रीय निवडणूक आयोगासमोर नियमित सुनावणी होणार आहे. आज सुनावणी सुरू झाली तेव्हा शरद पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. शरद पवार हेच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत, अजित पवार यांनी स्वत: शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात यावं यासाठी अनुमोदन दिलं होतं, असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला.

दरम्यान, अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रांपैकी अनेक सदस्यांचा मृत्यू झाला आहे. असा युक्तिवादही शरद पवार गटाकडून केला गेला. शरद पवार गटाचा युक्तिवाद आयोगाने मान्य केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज मेरीटवर युक्तिवाद अपेक्षित होता, परंतु... - तटकरे

सुनावणी संपल्यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, ''अतिशय अल्प अशा शपथपत्रांवर काही त्रुटी आहेत, अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. खरंतर आज मेरिटवरती युक्तिवाद त्या ठिकाणी अपेक्षित होता. परंतु या तांत्रिक पद्धतीच्या बाबी त्या ठिकाणी उपस्थित करत. थोडासा वेळ काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला.''

याशिवाय ''अडीच लाखांपेक्षा जास्त शपथपत्र आमच्याकडून दाखल झालेली आहेत. मात्र, अतिशय किरकोळ संख्येतील शपथपत्रामधील तांत्रिक बाबी सांगत, सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आम्हा मंडळींना वाटत आहे. तरीदेखील या संदर्भात २० नोव्हेंबरपासून सलग सुनावणी सुरू होईल, असं सूचित करण्यात आलेलं आहे. सलग सुनावणी सुरू राहावी अशी आमची मागणी होती. तोपर्यंत ज्या काही तांत्रिक त्रुटी असतील, त्याबद्दल जे काही म्हणणं असेल. आमच्याकडेही काही तांत्रिक त्रुटी शोधल्या गेल्या आहेत, त्याबाबतही काही माहिती असेल ती न्यायालयासमोर ठेवण्याचं काम पुढील कालावधीत केलं जाईल,'' अशी माहितीही तटकरेंनी प्रसारमाध्यमांना दिली.

याचा अर्थ असा अजित पवारांकडे काहीच समर्थन नाही - सिंघवी

तर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी माध्यमांना सांगितले की, ''अनेक अशी शपथपत्रं आहेत, ज्यामध्ये जे राष्ट्रवादी पद लिहिलेले आहे, ते पदच राष्ट्रवादीच्या घटनेत नाही, कधी लागू झालेले नाही. आम्ही असेही दाखवले आहे की काहींमध्ये केवळ गृहिणी असं नमूद करण्यात आलं आहे, झोमॅटोचा सेल्स मॅनेजर म्हणूनही लिहिलेलं आहे आदी बरच काही आहे. ज्याप्रकारे शपथपत्रं बनवली गेली आहेत, केवळ एका खोट्या खटल्याला समर्थन देण्यासाठी बनवली गेली आहेत. याचा अर्थ असा झाला की अजित पवारांकडे काहीच समर्थन नाही.''

झोमॅटो बॉय, सेल्समन, गृहिणी अशी पदं राष्ट्रवादीत नाहीत -

याशिवाय, झोमॅटो बॉय, सेल्समन, गृहिणी अशी पदं राष्ट्रवादीत नाहीत, असं शरद पवार गटाकडून सांगितलं गेलं आहे. ७३ वर्षांची व्यक्ती पक्षाचा युवक तालुकाध्यक्ष कसा? असा प्रश्नही करण्यात आला आहे, तर दहा-बारा-चौदा वर्षांच्या मुलांची आधारकार्डही अभिषेक मनू सिंघवी यांनी दाखवली. एकूणच अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर शरद पवार गटाच्या वकिलांकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT