Mumbai News : राजकीय वर्तुळात गेल्या चार दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे ऐन दिवाळीतच त्या बाबतच्या चर्चामुळे राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस बाबतच्या उलटसुलट चर्चेने वेग धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटणार आहेत, अशा चर्चा रंगल्या असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी येत्या काळात अजितदादा गटाचे 20 ते 30 आमदार फुटणार असल्याचा दावा केला. त्यावर राऊत यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून आमचा पक्ष एकसंघ आहे. आमचे आमदार एकत्र असल्याचे स्पष्ट केले.
याबाबत प्रसारमाध्यमाशी प्रतिक्रया व्यक्त करताना सुनील तटकरे म्हणाले, 'विधानसभेच्या निवडणुकीपासून संजय राऊत (Sanjay raut) यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते काहीही बोलत असतात. आमचा पक्ष एकसंघ आहे. आमचे आमदार एकत्र आहेत. कुठेही जाणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ आहे. आमचे 41 आमदार सुनेत्रा पवारांच्या नेतृत्त्वात काम करत आहेत. कोणीही फुटणार नाही.'
संजय राऊत ज्येष्ठ पत्रकार आहेत. माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. पण विधानसभा निवडणुका झाल्यापासून त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. कल्पोकल्पित कथा रचणं आणि सकाळी नरेटिव्ह सोडून देणे एवढंच काम राऊत यांना उरले आहे. ते तेवढंच काम करत असतात, असा दावा मीडियाशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी केला. यावेळी तटकरेंनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. सुनेत्रा पवारांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. ज्यावेळी ज्या गोष्टी असतील त्यावेळी त्या कळतील, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे विलिनीकरणात काही तथ्य आहे, असे मला वाटत नाही, असेही तटकरे म्हणाले.
शरद पवारांनीच आम्हाला घडवले : तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) काही आमदार शरद पवारांना भेटणार आहेत. त्यावरही तटकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भेटीचे मला माहीत नाही. शरद पवार हे सहा दशकापासून देश आणि राज्यासाठी समर्पितपणे काम करत आहेत. राज्य आणि देशात त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे रुबी रुग्णालयात असताना पंतप्रधान मोदींनी त्यांची चौकशी केली. 2015 मध्ये त्यांचा अमृत महोत्सव झाला. तेव्हा त्यांच्यासाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते एकत्र आले. त्यामुळे अशा नेत्याची तब्येत ठिक नसते तेव्हा ब्रीच कँडीतून आल्यावर त्यांना भेटायला जाणे हे स्वाभाविक आहे. पवारांनीच आम्हाला घडवले आहे.
आम्ही अजितदादांच्या नेतृत्त्वात एनडीएसोबत गेलो. तो एक राजकीय विचार असू शकतो. पण शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांना भेटायला जाण्यात काहीच गैर नाही. मीही मुंबईत असल्यावर त्यांना भेटायला जाईल, असे माध्यमाशी त्यांनी बोलताना स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.