NCP Merger news Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Merger: NCP विलीनीकरणाची पुन्हा चर्चा! शरद पवार यांच्या आमदाराच्या लेकीच्या पोस्टनं वाढवली उत्सुकता

Natasha Awhad's Post: मोदी-शाह भेटींनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग. नताशा आव्हाडांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण

Mangesh Mahale

NCP Merger News: अजित पवार यांच्या निधनानंतर काही काळ थंडावलेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांत दोन्ही गटांतील प्रमुख नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यांमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या स्वतंत्र भेटींमुळे नव्या राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. सध्या राज्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पोस्टकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.

नताशा आव्हाड यांची पोस्ट चर्चेत

"जेव्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे खासदार आणि नेते सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात, तेव्हा काहीतरी मोठी घटना घडते. कदाचित त्यांनी याकडे ईश्वराचा संकेत म्हणून पाहावे आणि आपण जिथे आहोत तिथेच राहण्याचा निर्णय घ्यावा.", असे नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.

या पोस्टमध्ये कोणत्याही पक्षाचे किंवा नेत्याचे नाव नसले, तरी ती सध्याच्या राजकीय घडामोडींशी जोडून पाहिली जात असल्याने विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीतील भेटींनी वाढवले तर्क

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील प्रमुख नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्रपणे भेट घेतली आहे. आधी शरद पवार, त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली. या भेटींची कारणे संबंधित नेत्यांकडून वेगवेगळी सांगितली जात असली, तरी त्या जवळपास एकाच कालावधीत झाल्याने त्यांच्या राजकीय अर्थांबाबत अनेक तर्क लावले जात आहेत.

विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा चालना?

सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी दोन्ही गटांनी एकत्र येण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या काही नेत्यांमध्ये संवाद झाल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असल्याचे बोलले जाऊ लागले.

याच काळात सुनील तटकरे यांनी, "विलीनीकरणाचा प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल," असे विधान केले होते. मात्र त्यानंतर शरद पवार यांनी अशा कोणत्याही विलीनीकरणाचा प्रश्न नसल्याचे स्पष्ट करत या चर्चांना फेटाळून लावले.

चर्चांना अधिक हवा

नताशा आव्हाड यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर या सर्व घडामोडींना आणखी वेग आला आहे. एकीकडे दिल्लीतील बैठका, दुसरीकडे विलीनीकरणाबाबतचे वेगवेगळे संकेत आणि त्याचवेळी आलेली ही पोस्ट यामुळे राज्याच्या राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मात्र, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार की नाही, अथवा या भेटींचा त्याच्याशी काही संबंध आहे का, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत या राजकीय घडामोडींना कोणते वळण मिळते, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT