Ahilyanagar News : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या कारभाराबाबत गेल्या अनेक दिवसापासून तक्रारी आहेत. अधिकारी आणि कर्मचारी वेगळे नियम लावून कारभार करतात. या कारभारात वेळीच सुसूत्रता आणावी. आयुक्त हे कारभाराचे प्रमुख असल्याने त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी. 'तडजोडी'साठी फायली अडवल्यास, स्वतःचे नियम लादल्यास, याबाबत एक जरी तक्रार आल्यास, मी स्वतः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांच्या तक्रारी करेन, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी दिला.
आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर शहरातील बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद तसेच महापालिका आयुक्त आणि नगररचना विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत नगररचना विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मक्तेदारी, हुकूमशाहीवर तक्रारी झाल्या. यावरून आमदार संग्राम जगताप चांगलेच आक्रमक झाले होते.
पात्रता नसतानाही कर्मचाऱ्यांकडून तांत्रिक मुद्द्यांवर अडवणूक केली जाते. अधिकारी मनमानीपद्धतीने कारभार करतात. वेळकाढूपणा करतात. या पाठीमागे 'अर्थकारण' दडलेले असते, असा आरोप क्रेडाई व एसा संघटनेच्या सदस्यांनी या बैठकीत केला. यानंतर आमदार संग्राम जगताप बैठकीत चांगलेच आक्रमक झाले.
महापालिकेच्या नगररचना कार्यालयात सुरु असलेल्या मनमानी कारभारावरून आयुक्तांना आमदार संग्राम जगताप यांनी कठोरातल्या कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली. स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करा. प्रलंबित सर्व प्रकरणे मंजूर करा. मनमानी, हुकूमशाही आणि अनागोंदी कारभार सुधारण्यासाठी तांत्रिक ज्ञान असलेले अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची नियुक्ती नगररचना कार्यालयात करा. आयुक्तांनी पालकाच्या भूमिकेमध्ये येऊन कारभारात सुधारणा करावी. त्या सर्वांसाठी आपले पाठबळ असेल, असेही आमदार जगताप यांनी सांगितले.
क्रेडाई व एसा संघटनेच्या सदस्यांना देखील आमदार जगताप यांनी चांगली समज दिली. नियमानुसारच बांधकाम करावे. वाहनतळ इमारतीमधील जीने हे नियमानुसारच असावे. ले-आउट करताना ओढे नाले बुजवून चुकीच्या फायली नगररचना कार्यालयात घेऊन येऊ नये, अशा कानपिचक्या दिल्या. चुकीच्या फायली घेऊन येतात. म्हणून तुमच्याकडे 'तडजोडी'साठी मागणी केली जाते. योग्य फाईल आणल्यास आणि त्याच्यावर 'तडजोडी'साठी मागणी झाल्यास थेट तक्रार करा. कोणी टार्गेट केले, तर आयुक्तांकडे तक्रार करा. त्याची दखल त्यांनी घेतली नाही, तर मला सांगा. कसा कारभारात सुधारणा होत नाही तेच बघतो, असे आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी म्हटले.
आमदार जगताप यांनी सांगितलेल्या उपाययोजनानुसार पुढील दहा दिवसांमध्ये नगररचना कार्यालयातील कारभारात सुसूत्रता आणणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. नगररचना कार्यालयातील कारभारात तडजोडीची छोटीशी जरी तक्रार आल्यास अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त डांगे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.