
Shirdi News : अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातून संग्राम जगताप तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. महायुती सरकारमध्ये यावेळेस हमखास मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा होती. परंतु संधी हुकली. हुकलेल्या मंत्रीपदावर संधी केव्हा मिळणार, यावर आमदार संग्राम जगताप यांनी शिर्डीतील नवसंकल्प शिबिरात माध्यमांशी संवाद साधताना मोठे विधान केले.
"मला मंत्रीपद निश्चित मिळणार, पुढच्या अडीच वर्षांच्या आतमध्ये मंत्रीपद मिळेल. महायुती सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्यामुळे ओढाताण होत असते. निश्चितच ऐनवेळी संधी हुकली. तिसऱ्या टर्ममध्ये काम करत आहे. त्यामुळे मला पुढील काही दिवसांतच मला मंत्रीपदावर संधी मिळेल', असे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीवर बोलताना संग्राम जगताप म्हणाले, 'भुजबळसाहेब हे पक्षाचे जेष्ठ नेते आहेत. पक्षातील वरिष्ठ नेते हे त्यांच्या संपर्कात असतात. पक्षामध्ये काम करत असताना कमी-जास्त होत असतं. पण ज्येष्ठांचे मार्गदर्शन देखील महत्त्वाचे असते. भुजबळ साहेब आज शिबिरात सहभागी झाल्याने चांगले वाटत आहे. याशिवाय शिबिर स्थळी लावण्यात आलेल्या प्रत्येक फलकावर भुजबळसाहेबांचे फोटो आहेत. त्यामुळे ते कुठेही नाराज नाहीत, असे सध्यातरी दिसत आहे.
आमदार संग्राम जगताप गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) राहून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेत. कर्जत येथील सिद्धटेक मंदिराच्या प्रवेशद्वारावर झालेल्या अनधिकृत अतिक्रमणाविरोधात आयोजित सकल हिंदू समाज मोर्चात संग्राम जगताप केंद्रस्थानी होते. शिर्डी येथे नवसंकल्प शिबिरात देखील त्यांनी साई समाधी मंदिर परिसरात असलेल्या चौथ्या समाधीवरून आक्रमक भूमिका घेतली.
साई मंदिरातील 'त्या' चौथ्या समाधीचे उत्पन्न सरकारला मिळावे
साई समाधी मंदिर परिसरात चार समाधी आहेत. चौथ्या समाधीचे उत्पन्न हे सरकार जमा न होता, थेट समाधी सांभाळणारे घेत आहेत. हा दुजाभाव का? याबाबत आपण राज्य सरकार आणि शिर्डी देवस्थान विश्वस्तांचे लक्ष वेधणार आहोत. त्यासोबतच स्थानिक शिर्डीकरांशी चर्चा करून या चौथ्या समाधीबाबतीत लवकरच भूमिका घेऊ. ज्याप्रमाणे सर्व हिंदू देवस्थानचे उत्पन्न सरकार जमा होते, त्याचपद्धतीने या चौथ्या समाधीचे उत्पन्न देखील सरकार जमा व्हायला हवे, अशी आमची मागणी आहे, असे आमदार संग्राम जगताप म्हणाले.
जिथे आक्रमक व्हायचं तिथे नक्कीच होणार
राज्यातील अनेक भागात अनधिकृत अतिक्रमण झाली आहेत. तिथे धार्मिक रंग दिला जात आहे. परंतु अनधिकृत बांधकाम केल्यास तिथे आम्ही भगवे उभारू, असा इशाराही आमदार संग्राम जगताप यांनी दिला. आता मी शिर्डीत आहे. या मुद्द्यांवर जास्त काही बोलणार नाही. परंतु जिथे आक्रमक व्हायचंय तिथे नक्कीच बोलेन. पक्षाचे व्यासपीठ हे सर्व समावेशक आहे. परंतु आमची भूमिका ही वैयक्तिक आहे, असेही संग्राम जगताप म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.