Zeeshan Siddique appointed NCP Mumbai president Sarkarnama
महाराष्ट्र

Zeeshan Siddique : राष्ट्रवादीला मिळणार नवा बूस्टर डोस! पार्थ पवारांनी दिली 'या' युवा नेत्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे

Zeeshan Siddique appointed NCP Mumbai president : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे युवा नेत्याकडे सोपवली. कोणत्या नेत्याची नियुक्ती झाली? जाणून घ्या सविस्तर राजकीय बातमी.

Rashmi Mane

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबईतील पक्षाची जबाबदारी युवा नेते आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयामुळे मुंबईतील पक्ष संघटनेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पक्षातील रिक्त पदांवर नव्या नियुक्त्या करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ नेते पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झिशान सिद्दिकी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांची राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे पक्षाच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वाचे बदल झाले आहेत.

मुंबईसारख्या महत्त्वाच्या राजकीय केंद्रात पक्षाची धुरा झिशान सिद्दिकी यांच्याकडे देण्यात आल्याने आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. मुंबईतील पक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांना एकत्र आणणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढवणे, ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील.

झिशान सिद्दिकी हे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आहेत. त्यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजय मिळवत ते पहिल्यांदा आमदार झाले. यापूर्वी त्यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही सांभाळले होते.

12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. या घटनेनंतर झिशान सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली. मात्र, शिवसेनेचे उमेदवार वरुण सरदेसाई यांनी त्यांचा पराभव केला. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली.

आता मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर झिशान सिद्दिकी पक्ष संघटनेत कोणते बदल करतात आणि मुंबईतील राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT