Shivraj Motegaonkar Viral Video : देशभरात चर्चेत असलेल्या 'नीट' पेपर फुटी प्रकरणातील प्रमुख आरोपी आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकरचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे.
सध्या सोशल मीडियावर मोटेगावकरचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो क्लासमध्ये चक्क जादूटोणा आणि भोंदूगिरीसारखा प्रकार करत असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओवरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शिवराज मोटेगावकर क्लासमधील विद्यार्थ्यांवर तांब्याच्या भांड्यातील पाणी शिंपडताना दिसत आहे. शिवाय हे पाणी गवताच्या काडीच्या सहाय्याने शिंपडताना तो "तुम्ही एम्सला लागणार" असं म्हणत असल्याचंही ऐकू येत आहे.
त्यामुळे आधीच क्लासमधील मुलांचा चांगला निकाल लावण्यासाठी पेपर फोडण्यापर्यंत मजल मारलेल्या मोटेगाकरचा हा व्हिडिओ म्हणजे भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारा असल्याचं बोललं जात आहे.
शिवाय हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मोटेगावकर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असून जिथे शिक्षणाच्या आणि स्वत:च्या बुद्धीमतेच्या जोरावर मुलांनी करिअर घडवायचं असतं, त्याच क्लासमध्ये अंगावर पाणी शिंपडत मुलांना एम्समध्ये लागणार असा दावा करणं, कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणातील तपास सीबीआयकडून वेगाने सुरू आहे. सीबीआयने मोटेगावकरला ताब्यात घेतलं आहे. यासह लातूरमधील काही डॉक्टर, पालक आणि विद्यार्थ्यांचीही चौकशी सुरू आहे. अशातच मोटेगावकरने पुण्यातील वारजे भागात ५१ गुंठे घेतली असल्याचे उघडकीस आलं आहे. ही जमीन सामाजिक संस्थेच्या नावाने विकत घेतल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे मोटेगावकरने एवढी संपत्ती कशी कमावली अशीही विचारणा आता केली जात आहे.