Mumbai News : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींकडून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना नव्या वर्षात एक नवीन सुरूवात करूयात, असे म्हटले आहे. आपल्या पक्षासाठी २०२४ हे अत्यंत संमिश्र वर्ष होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील यांनी सोशल मीडियातून नवीन वर्षाच्या शुभेच्या दिल्या आहेत. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तयारीला लागण्याचे आवाहनही केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकीकडे आपल्या पक्षाचे लोकसभेत सर्वाधिक 8 खासदार निवडून आले तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मात्र आपल्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असे यश आपल्याला मिळाले. अर्थात, या अपयशाची कारणीमिमांसा विविध स्तरांवर चालू आहेच.
आता दीन दुबळ्यांची, पददलितांची, शेतकरी, कामगार व महिलांची लढाई पुन्हा एकदा नव्याने लढण्यासाठी सज्ज होण्याची ही वेळ आहे. सह्याद्री सारख्या कणखर अशा आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत, साहेबांचा कार्यकर्ता हा सदैव लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाही, असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न पाटील यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे.
निवडणुकीत जे अपयश आले ते मागे सोडून आता पुढे जाऊयात. आजही आपल्या पक्षातील एकही पदाधिकारी अथवा कार्यकर्ता जागेवरून हललेला नाही, हेच आपल्या पक्षाचे सर्वात मोठे यश आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र धर्म रक्षणाच्या लढाईसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सज्ज होऊयात. छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहू आंबेडकर हा आपल्या पक्षाचा DNA आहे, हे आपण विसरता कामा नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
निवडणुकीतील लाट ही केवळ एकदाच येत असते, म्हणूनच नव्या वर्षात एक नवीन सुरुवात करूयात. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचे आहे, असे म्हणत पाटील यांनी एकप्रकारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रणशिंग फुंकले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.