Indian democracy debate : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकारणावर बोलताना रोखठोक विधान केले आहे. अमरावती येथे रविवारी एका कार्यक्रमात लोकशाहीवर बोलताना त्यांनी जशी जनता तसे नेते मिळतात, असे विधान केले. एवढेच नाही तर हे बोलण्यासाठी धाडस लागतं, पण मी ते करतो, असेही ते म्हणाले आहेत.
अमरावतीतील शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन हर्षवर्धन देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्ष अभिष्टचिंतन सोहळ्याला गडकरी उपस्थित होते. या कार्यक्रमातील भाषणात बोलताना त्यांनी पक्षांतरावरून नेत्यांचे कान उपटले. ते म्हणाले, सध्या राजकारणातील ९० टक्के खेळाडू वाटच पाहतात की कोणत्या पक्षाचे सरकार येतंय आणि कोण मंत्री बनतंय. त्यांचे झेंडे, दंडे, हार तयारच असतात. त्यांनी पक्ष का सोडला, हे त्यांनाही कळत नाही. आणि ते ज्या पक्षात गेलेत त्यांनाही उमजत नाही.
मी कुणाबद्दलही बोलत नाही. पण अशी स्थिती होण्याचे कारण असे आहे की, राजकारणात तत्वनिष्ठा, ध्येयनिष्ठा, विचारनिष्ठा कमी झाली आहे. आपल्या देशात विचारभिन्नता ही समस्या नाही, विचारशुन्यता ही समस्या आहे. म्हणून कधी चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात. कधी जनता निवडून देते, कधी निवडून देत नाही. परंतु जिवंत माणसाचं व्यक्तित्व असं असतं की, तो प्रवाहाबरोबर कधी वाहत जात नाही. जिवंत मासा नेहमी प्रवाहाच्या विरूध्द पोहत असतो. तर काडी-कचरा आणि मेलेला मासा हा नेहमी प्रवाहाबरोबर वाहत असतो, असेही गडकरी यांनी नमूद केले.
शिक्षणसंस्थांमधील निवडणुकांवर भाष्य करताना गडकरी यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आपल्या देशातील लोकशाही जी आहे, त्याला खऱ्या अर्थाने जबाबदार नेते किंवा पक्ष नाही, जनता जबाबदार आहे. जशी जनता तसे नेते मिळतात लोकांना. हे बोलण्यासाठी धाडस लागतं, पण मी ते करतो. त्यामुळे तुम्ही ठरविले पाहिजे की, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काम करणाऱ्या लोकांना निवडून द्यायचे की निवृत्त करायचे. त्यामुळे निवडणुका टाळल्या पाहिजेत.
राजकारणाच्या निवडणुकांपुरते राजकारण १५ दिवसांचे, २० दिवसांचे सगळ्यांनी केले पाहिजे. निवडणुका संपल्यानंतर ते राजकारण सत्ताकारण न राहता समाजकारण झालं पाहिजे. ते करत असताना जे योग्य आणि चांगले असेल तर सगळ्यांचे केले पाहिजे. चुकीचे असेल तर आपले असले तरी त्याला समजावून सांगितले पाहिजे, हे योग्य नाही, असेही गडकरी म्हणाले.
राजकारणात राजकारणाची व्याख्या बदलण्याची गरज नाही. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही. राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. हा विचार स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या मनामध्ये होता. म्हणून त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. शेतकऱ्यांची समस्या होती. शेती क्षेत्राबद्दल आत्मीयता ठेऊन ते चित्र बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. हे कठीण काम आहे. कारण येणाऱ्या काळात तळागाळातील माणसाचे जीवन बदलविणे हे सोपे काम नाही, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.