

Indian Politics news : तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने तडकाफडकी सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीकेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा जाहीर केला. एवढेच नाही तर आगामी सर्व निवडणुकांसाठी ही आघाडी कायम राहील, असेही जाहीर करून टाकले. त्यानंतर राज्यातील काँग्रेसचा ताकदवान मित्रपक्ष असलेल्या डीएमकेने थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून काँग्रेससोबत आसनव्यवस्था नको असे सांगत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढेच नाही तर इंडिया आघाडीतील अन्य काही नेत्यांनी काँग्रेसचे कान टोचले होते. ष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीआधीच इंडिया आघाडीत फाटाफूट झाली, असा दावा भाजपच्या अनेक नेत्यांनी केला. पण शनिवारी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेला हल्ला पुन्हा एकदा इंडिया आघाडीसाठी फलदायीच ठरला आहे, असे म्हणायला हरकत नाही. भाजपसह काँग्रेस व इतर सर्वच पक्षांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि तो करायलाच हवा. सत्ता कुणाचीही असो, नेता कुणीही असो, अशाप्रकारचा निंदनीयच आहे. त्याचे कुणीच समर्थन करणार नाही. पण अशा हल्ल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद काय उमटतात, हे पाहणेही महत्वाचे असते.
राजकारणातील कोणतीही घडामोड हलक्यात घ्यायची नसते. त्याचे दीर्घकालीन पडसाद उमटत असतात. अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन केला होता. खुद्द ममतांनीच याची माहिती दिली. राहुल यांनी केवळ हल्ल्याचा निषेधच केला नाही तर अभिषेक यांना उपचारासाठी हैद्राबादला नेण्याची तयारीही त्यांनी दाखविली. ममतांनी आरोप केला होता की, अभिषेक यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. यापार्श्वभूमीवर राहुल यांनी दाखविलेली समयसूचकता महत्वाची ठरली.
राहुल यांची ही काळजी ममता बॅनर्जी यांनाही भावली. पत्रकारांसमोर याचा त्यांनी जाहीरपणे उल्लेख केला. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतरही राहुल यांनी त्यांना फोन करत व्होट चोरीचा मुद्दा उपस्थित करत आधार देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच सोशल मीडियातही निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला होता. अभिषेक यांच्यावरील हल्ल्यानंतरही राहुल यांनी सोशल मीडियात पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
राहुल यांची ही पोस्ट शेअर करत अभिषेक पहिल्यांदाच आपल्यावरील हल्ल्यानंतर सोशल मीडियात व्यक्त झाले. राहुल यांचे आभार मानताना अभिषेक यांनी म्हटले आहे की, भारताचा आत्मा जपण्यासाठी, घटनात्मक संस्थांचे संरक्षण करण्यासाठी आणि आपल्या संविधानात नमूद केलेल्या मूल्यांचे पालन करण्यासाठी आम्ही एकजुटीने आणि ठामपणे लढत आहोत. लोकशाही कमकुवत करण्याचा आणि देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधातील आमचा लढा सुरूच राहील. भारत एकसंघ आहे आणि आपण सर्वजण मिळून भीती, द्वेष, हिंसा आणि दडपशाहीच्या राजकारणाचा पराभव करू. जनतेचाच आवाज विजयी होईल, असे लिहित अभिषेक यांनी भाजपविरोधात एकजुटीचा नारा दिला आहे.
अभिषेक यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद केवळ बंगालपुरते मर्यादीत राहणार नाहीत. तर देशभरातली विरोधकांच्या एकीचेही कारण ठरू शकतात. बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर ममतांनी देशभरात भाजपविरोधातील विरोधकांचा आवाज मजबूत करण्यासाठी आपण आता लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. बंगालमधील या घटनेनंतर आता त्या अधिक आक्रमकपणे भाजपविरोधात आवाज उठवतील, हे निश्चित. तमिळनाडूमध्ये डीएमकेची काँग्रेसवरील नाराजी कमी करण्यासाठी त्या प्रयत्नशील राहतील. याचा थेट फायदा काँग्रेस आणि राहुल गांधींना होणार नाही.
इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्ष कमजोर होत असताना आता त्यांना देशपातळीवर काँग्रेसचाच आधार आहे. दक्षिण भारतात आंध्र प्रदेश वगळता चार राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. तर उत्तर भारतात एकमेव हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाचे सरकार आहे. उत्तरेतील अन्य राज्यांमध्ये भाजपने काँग्रेससह प्रादेशिक पक्षांना पराभूत केले आहे. त्यामुळे विरोधकांना एकत्रित येऊनच भाजपचा सामना करावा लागणार आहे. त्याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करणे शक्य होणार नाही. बंगालमध्ये सत्ता आल्याने लोकसभेतही त्याचा फायदा भाजपला होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तिथे ममतांना काँग्रेसचा हात हातात घ्यावा लागू शकतो. पुढील काही महिन्यांत त्याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. पण विरोधकांवर जेवढे वार होतील, तेवढेच ते एकजुट होतील, हे सध्याच्या स्थितीवरून स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.