BJP win Rajya Sabha : देशात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपसह एनडीएला मोठं यश मिळालं आहे. प्रामुख्याने बिहार आणि ओडिशामध्ये विरोधकांची मतं फोडत भाजपने एक-एक उमेदवार निवडून आणत धक्का दिला आहे. ओडिशामध्ये विरोधकांची तब्बल १४ मते फुटल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे भाजपने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा सहज विजय झाला. या विजयात महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाही मोठा वाटा आहे.
भाजपचे सरचिटणीस आणि नवनियुक्त राज्यसभा खासदार विनोद तावडे हे बिहारचे प्रभारी असताना पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली होती. आता तावडेंवर केरळची जबाबदारी टाकण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष असताना भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून देणारे बावनकुळे यांच्यावर ओडिशातील राज्यसभा निवडणुकीची मोहिम फत्ते करण्यास सांगण्यात आले होते.
बावनकुळे हे ओडिशा राज्यसभा निवडणुकीचे पक्षाचे निरीक्षक होते. राज्यात चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने तीन जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बिजू जनता दलाला केवळ एक जागा मिळाली आहे. खरंतर आमदारांचे संख्याबळ पाहिल्यास भाजपला तिसरा जागा जिंकणे कठीण जाणार असल्याची चर्चा होती.
निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल आणि विद्यमान खासदार सुजीत कुमार हे भाजपचे उमेदवार होते. तर दिलीप रे हे भाजप पुरस्कृत उमेदवार होते. रे यांच्याविरोधात बीजेडीने उमेदवार दिला होता. ओडिशामध्ये एकूण आमदारासंख्या १४७ एवढी आहे. भाजपचे संख्याबळ ७९ असून दोन खासदार सहज निवडून येणार होते. पण भाजपने तिसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देत निवडणुकीत रंगत आणली.
मतदानामध्ये बीजेडीच्या ११ आणि काँग्रेसच्या तीन आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. पक्षाचे व्हीप जुगारून क्रॉस व्होटिंग करत या आमदारांनी भाजपला मदत केली. त्यामुळे दिलीप रे यांचा विजय सुकर झाला. तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला विरोधकांच्या मतांवरच अवलंबून राहावे लागणार होते. त्यानुसार निरीक्षक असलेल्या बावनकुळे यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांना विरोधकांच्या मतांमध्ये फूट पाडण्यात यश आले आणि भाजपचे ओडिशातून तीन खासदार राज्यसभेत गेले. आपले आमदार एकसंध ठेवण्याबरोबरच विरोधकांची मते मिळविण्याचे आव्हान भाजपसमोर होते.
दरम्यान, बानवकुळे यांनी महाराष्ट्रात आपल्या नेतृत्वाखाली भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष असताना २०२२ पासून राज्यभर दौरे करत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची फळी मजबूत केली. पक्षाचे संघटन बळकट केले. परिणामी, विधानसभा निवडणुकीत भाजपला अविश्वसनीय यश मिळाले. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बावनकुळे यांचे कौतुक केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.