Corruption News Maharashtra 2026 Sarkarnama
महाराष्ट्र

Corruption News : लाचखोरीच्या आरोपात रंगेहात सापडला : घरीही कोट्यवधींचे घबाड; 'त्याच' अधिकाऱ्याला बढतीचा आशीर्वाद, अधिसूचना प्रसिद्ध

RTO Officer Promotion Controversy : घरी कोट्यवधी रुपये सापडूनही घोटाळ्यातील अधिकाऱ्याला बढती मिळाल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह.

Rashmi Mane

Rajendra Keskar gets promotion despite corruption charges: राज्याच्या परिवहन विभागाने लाचखोर आरटीओ अधिकाऱ्याला पदोन्नतीचे बक्षीस देण्याचे ठरविले आहे. राज्यातील ४० सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदी पदोन्नती देण्यासाठी सोमवारी (ता. ९) अधिसूचना प्रसिद्ध केली. यात राजेंद्र केसकर या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचादेखील समावेश केला आहे.

केसकर यांना गोंदिया आरटीओ कार्यालयात ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. शिवाय त्यांच्या पुण्यातील घराच्या झडतीत रोख रक्कम, सोने व चांदीसह ४ कोटी २५ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. मात्र, या लाचखोर अधिकाऱ्याला पदोन्नतीचे बक्षीस दिले आहे. यामुळे सामान्य प्रशासन व परिवहन विभागाच्या ‘पारदर्शक’ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पश्चिम बंगाल येथून खरेदी केलेल्या ‘जेसीबी’ वाहनाच्या नोंदणीकरिता राजेंद्र केसकर यांनी तक्रारदाराकडून ७० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्या प्रकरणी नागपूरच्या पथकाने सापळा रचून, राजेंद्र केसकर यांना अटक केली. ही कारवाई दीड महिन्यांपूर्वी झाली. या प्रकरणाचा अद्याप तपास सुरु आहे.

कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असताना, जोपर्यंत गुन्ह्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत त्याला पदोन्नती दिली जात नाही. असे असताना हा नियम पायदळी तुडवून केसकर यांना ‘उप प्रादेशिक परिवहन अधिकारी’ या पदाचे बक्षीस दिले जात आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल असताना त्याच्या सेवा पुस्तिकेत या गुन्ह्याचा उल्लेखच नाही.

मी तीनच दिवसांपूर्वी परिवहन विभागाचा कार्यभार स्वीकारला आहे. राजेंद्र केसकर यांच्याबाबत गुन्हा दाखल असल्याचे मला माहीत नाही. पदोन्नतीची यादी पदोन्नती समितीने तयार केली आहे. मी या संदर्भात सामान्य प्रशासनाशी चर्चा करेन, अशी प्रतिक्रिया परिवहन विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिली आहे.

SCROLL FOR NEXT