Marathwada Lok Sabha MPs Omprakash Rajenimbalkar, Ravindra Chavan, Kalyan Kale, Shivaji Kalge, Nagesh Patil Ashtikar, Bajrang Sonawane, Sanjay Jadhav and Sandipan Bhumre. Sarkarnama
महाराष्ट्र

Marathwada News : मराठवाड्यातील 8 खासदार किती शिकलेले? ओम राजेनिंबाळकर, संदीपान भुमरे की बजरंगबाप्पा, सर्वाधिक शिक्षित कोण?

Marathwada News : मराठवाड्यातील आठ लोकसभा खासदारांमध्ये अभियंते, डॉक्टर, पदवीधर आणि मॅट्रिक पास नेत्यांचा समावेश आहे. ओमप्रकाश राजेनिंबाळकर ते संदीपान भुमरे यांच्या शैक्षणिक पात्रतेची सध्या चर्चा सुरू आहे.

Jagdish Pansare

Marathwada News : आपण निवडून दिलेला खासदार किती योग्य, किती शिकलेला आणि लोकसभेच्या सभागृहात मतदारसंघातील प्रश्न किती प्रभावीपणे मांडतो याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. पूर्वीच्या काळात राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती या फार शिकलेल्या नसायच्या. तरी त्यांनी आपल्या कार्याची छाप राजकारणात सोडल्याचे दिसून आले आहे.

2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात काही जुने तर काही नवे चेहरे निवडून आले. परभणी, धाराशीव लोकसभा मतदारसंघात मतदारांनी आधीच्या खासदारांना पसंती दर्शवली, तर छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, जालना आणि हिंगोली या पाचही मतदारसंघात नवे चेहरे निवडून आले.

आता निवडणुका होऊन दीड वर्ष उलटले आहे. त्यामुळे आपल्या खासदाराने लोकसभेत मतदारसंघाचे किती प्रश्न मांडले याची उत्सुकता तर त्यांना निवडून दिलेल्या मतदारांना आहेच. पण आपला खासदार किती शिकलेला आहे, याची कल्पना अनेकांना नसते. तर मराठवाड्यातील लोकसभेवर निवडून गेलेल्या आठ खासदारांपैकी 4 खासदार सर्वात उच्च शिक्षित आहेत.

धाराशीव, नांदेडचे खासदार उच्च शिक्षित :

धाराशिव आणि नांदेडचे खासदार उच्च शिक्षित आहेत. धाराशीवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पुणे विद्यापीठातून आयटी शाखेतील अभियांत्रिकी पदवी घेतलेली आहे. नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. त्यांनी विज्ञान शाखेतून एमस्सी अॅग्री ही पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

जालना आणि लातूरकरांचे नेतृत्व डॉक्टरांकडे :

जालना आणि लातूरकरांचे नेतृत्व करणारे दोन्ही खासदार पेशाने डॉक्टर आहेत. जालनाचे खासदार कल्याण काळे यांनी होमिओपॅथिक मेडीसीन आणि शस्त्रक्रिया अभ्यासक्रमाचा डिप्लोमा केलेला आहे. तर लातूरचे काँग्रेस खासदार डॉ. शिवाजी काळगे हे पदव्युत्तर असून ते नेत्रतज्ञ आहेत.

आष्टीकर आणि सोनवणे पदवीधर :

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे पदवीधर आहेत. या मतदारसंघातून ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत, यापूर्वी ते हदगाव विधानसभा मतदारसंघातून आमदारही होते. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केलेले बजरंग सोनवणे हे पदवीधर आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी B.A.पदवी प्राप्त केलेली आहे.

परभणी, संभाजीनगरचे खासदार मॅट्रिक पास :

परभणी लोकसभेचे 3 टर्म खासदार असलेले संजय जाधव यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले आहे. पुढे त्यांनी अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले पण ते बारावीत अनुतीर्ण राहिले. पैठण विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा आमदार, महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात दोनवेळा मंत्री राहिलले छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे खासदार संदीपान भुमरे हे ही दहावी उतीर्ण आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT