

Fadnavis on Lockdown: पश्चिम आशियाताील युद्धजन्य परिस्थितीमुळं क्रूड ऑईल, एलपीजी आणि खाद्य तेलांसह सोन्याच्या पुरवठा साखळीत अडथळा निर्माण झाल्यानं मोठा तुटवडा निर्माण होण्याची चिन्हं आहेत. तसंच यावर सध्या मोठ्या प्रमाणावर परेदशीच चलन खर्च होत असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना या सर्व गोष्टी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन केलं आहे.
त्यातच याच जागतिक परिस्थितीचा दाखला देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागले असल्याचं सांगत एक प्रकारे भारतातही लॉकडाऊनचे संकेतच त्यांनी दिले आहेत. या विधानामुळं त्यांनी भारतीयांची धाकधुक वाढवली आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं आज फडणवीसांच्या हस्ते अनावरण झालं, यावेळी १३ आखाड्यांच्या प्रमुख साधुंसोबत यावेळी बैठकही पार पडली. या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी मोदींच्या आवाहनावर बोलताना हे भाष्य केलं.
फडणवीस म्हणाले, "जेव्हा वैश्विक संकटाची वेळ आलेली असते तेव्हा जर आपल्या देशाचे पंतप्रधान काही उपाय सांगतात तर त्याला सकारात्मक पद्धतीनं घ्यायला हवं. आपण पाहतोय की सध्या जगातील अनेक देशांतील परिस्थिती खराब आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन झालं असून काही देशांमध्ये पेट्रोलचे भाव हे ४०० ते ५०० रुपयांवर पोहोचले आहेत. तीन-तीन दिवस पेट्रोल भेटत नाहीए, त्यामुळं या जागतीक संकटाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सुरळीत चालावी, देशासमोर संकट निर्माण होता कामा नये या दृष्टीनं जर काही उपाय पंतप्रधान सांगत असतील आणि विरोधक जर या उपायांची अंमलबजावणी करु शकत नसतील तर त्याची किमान याची थट्टामस्करी तरी करु नये.
कारण प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे की आपापल्या पद्धतीनं सर्वांनी या उपायांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा. महाराष्ट्र सरकारनं देखील मंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यांचा विषय असेल किंवा परदेश दौऱ्यांचा विषय असतील किंवा विविध प्रकारांनी जिथं देशाचं परकीय चलन जिथं खर्च होतं त्यांचा कमीत कमी वापर कसा करता येईल प्रयत्न आहे. यासंदर्भात आम्ही एक बैठकही बोलावली आहे, निश्चित रुपात पंतप्रधानांनी जो संदेश देशवासियांना दिला आहे त्यादृष्टीनं महाराष्ट्र देखील काम करेल.
आपल्याकडं महागाई वाढू नये यासाठी पंतप्रधानांनी ज्या काही उपाययोजना सांगितल्या आहेत, त्यात प्रत्येकानं आपल्या जीवनशैलीत थोडासा जरी बदल केला तरी देखील आपण देशाला मदत करु शकू. सहा महिन्यांसाठी जर प्रधानमंत्र्यांनी जर देशवासियांना आवाहन केलं आहे तर मला विश्वास आहे की, भारतातील आपली जनता मदतच करेल. विरोधकांनी कितीही थट्टा केली तरी वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभे राहिलो नाहीतर ते योग्य होणार नाही. महाराष्ट्र आम्ही निर्णय केला आहे की मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे कॉन्व्हाय हे छोटे असतील. विदेश यात्रांवर आम्ही निर्बंध आणतो आहोत. ज्या ज्या गोष्टीत परकीय चलन खर्च होतं त्या त्या गोष्टींचा वापर कसा कमी होईल याचा आम्ही विचार करत आहोत. तसंच आपल्या स्वदेशी वस्तूंचा कसं प्रोत्साहन देता येईल याचाही आम्ही विचार करत आहोत, अशा पद्धतीनं पंतप्रधानांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र शासन काय काय करत आहे याची सविस्तर माहिती यावेळी फडणवीसांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.