Operation Lotus sarkarnama
महाराष्ट्र

Operation Lotus : जिथं मित्रपक्षाचा आमदार तिथं भाजप शोधतोय उमेदवार? इंदापूर - पुरंदर - भोर मार्गे 'मिशन लोटस एक्सप्रेस' जुन्नरला रवाना!

Operation Lotus NCP Sharad Pawar Satyashil Sherkar : भाजपने पुणे जिल्ह्यावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. मित्रपक्षांचे जेथे आमदार येथे तेथे विरोधी पक्षातील बलवान नेत्यांनी आपल्याकडे घेण्यास भाजपने सुरुवात केली आहे. जुन्नरमध्ये देखील अशी रणनीती आखल्याची चर्चा आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असलेले सत्यशील शेरकर यांची भाजपचे वरिष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत भेट झाली आहे. या भेटीदरम्यान बंद दाराआड झालेल्या चर्चेमुळे जुन्नरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सत्यशील शेरकर यांनी 2024 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते पक्षाच्या कार्यक्रमांपासून अलिप्त राहिले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीतील काही नेत्यांवर उमेदवारीसाठी अडथळे आणल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना बळ मिळाले. आता विखे पाटील यांच्यासोबतच्या भेटीमुळे शेरकर भाजपमध्ये प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या भेटीबाबत शेरकर म्हणाले, “राधाकृष्ण विखे पाटील हे शेतकऱ्यांचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. आमच्या चर्चेत शेतकऱ्यांचे पाणीप्रश्न, कुकडी प्रकल्प, साखर कारखानदारी आणि सामाजिक-राजकीय विषयांवर संवाद झाला.”

दरम्यान, भाजपने पुणे जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्यासाठी आक्रमक रणनीती अवलंबली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने भोर मधील माजी आमदार संग्राम थोपटे तसेच पुरंदर मधील माजी आमदार संजय जगताप घेतला आहे. त्यासोबतच इंदापूर मधून प्रवीण माने भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

जुन्नरवर लक्ष केंद्रीत

पुणे शहरात भाजपची ताकद गेल्या काही वर्षांपासून वाढली असताना आता जिल्ह्यातही आपली ताकद वाढवण्यासाठी भाजपने 'मास्टर प्लॅन' आखल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भोर, इंदापूर आणि पुरंदर येथील नेत्यांना पक्षात सामील करून घेतल्यानंतर आता जुन्नरवर लक्ष केंद्रित केलंय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

2024 मध्ये शेरकर यांचा अवघ्या 7,000 मतांनी पराभव झाला होता, त्यामुळे 2029 च्या निवडणुकीसाठी त्यांना पक्षात आणण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो. यापूर्वी शेरकर यांनी अजित पवार यांचीही भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शेरकर काय निर्णय घेणार?

जुन्नरमधील सध्याचे आमदार शरद सोनवणे हे अपक्ष म्हणून निवडून आले असून, त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-शिवसेना युती यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. शेरकर यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT