Pankaja Munde Sarkarnama
महाराष्ट्र

Pankaja Munde News: पंकजा मुंडेंच्या खात्याचं ‘पॉवर सेंटर' एकाच अधिकाऱ्याकडे? चार महत्त्वाची पदं पुण्यातील एकाच व्यक्तीकडे

Maharashtra News: पशुसंवर्धन विभागातील योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या तीन महत्त्वाच्या पदांचा अतिरिक्त भार गेल्या वर्षभरापासून एकाच अधिकाऱ्याकडे आहे.

सरकारनामा ब्युरो

नागपूर : पशुसंवर्धन विभागातील योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या तीन महत्त्वाच्या पदांचा अतिरिक्त भार गेल्या वर्षभरापासून एकाच अधिकाऱ्याकडे आहे. विदर्भ-मराठवाड्यात वरिष्ठ अधिकारी उपलब्ध असताना त्यांना डावलून पुण्याला पदभार दिल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (एमएलडीबी), शेळी-मेंढी महामंडळ, विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प आणि अतिरिक्त आयुक्त, पुणे या चार महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचा भार वर्षभरापासून शेळी-मेंढी महामंडळाचे संचालक या एकाच अधिकाऱ्याकडे आहे. पशुधन विकास, दुग्ध व्यवसाय तसेच शेळी-मेंढी पालनाशी संबंधित योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या चारही पदांना विशेष महत्त्व आहे. या संस्थांच्या कामकाजाशी संबंधित प्रशासकीय निर्णय, योजनांचा आढावा, निधी व प्रस्तावांवरील कार्यवाही तसेच विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असते.

विदर्भ आणि मराठवाड्यात चार प्रादेशिक सहआयुक्त उपलब्ध आहे. २०१७च्या शासन निर्णयानुसार विभागाच्या प्रमुख रिक्तपदाचा पदभार समकक्ष असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पदभार देण्याचे नमूद आहे. त्या अनुषंगाने विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचा भार, नागपूर, अमरावती, लातूर, अहिल्यानगर यापैकी कुणा एका सहआयुक्ताकडे देणे अपेक्षित होते. पण यापैकी कुणाकडेही अतिरिक्त जबाबदारी न देता पुण्यातील अधिकाऱ्याची निवड करण्यात आली. प्रशासनातील जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करण्याऐवजी एका अधिकाऱ्यावरच अतिरिक्त कामाचा भार टाकण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

मंत्र्यांनंतर एकच व्यक्ती सर्वेसर्वा?

पुणे येथील अतिरिक्त आयुक्त असलेल्या व्यक्तींकडे सध्या स्थितीत राज्याच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार आहे. शिवाय वर्षभरापासून महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (एमएलडीबी), दोन वर्षांपासून शेळी-मेंढी महामंडळ, तसेच विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचा गेल्या सात महिन्यांपासून पदभार आहे.

ही नियुक्ती प्रशासकीय गरज म्हणून करण्यात आली की त्यामागे अन्य काही कारण आहे? याची चर्चा पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये रंगू लागली आहे. जबाबदारीच्या या केंद्रीकरणामुळे पशसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यानंतर एकच व्यक्ती सर्वेसर्वा बनल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT