Marathwada School Closed : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आज सहाव्या दिवशीही सुरू आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याने मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारकडून अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण मराठवाड्यात बंदची हाक देण्यात आली आहे.
परभणी, लातूर, बीड, धाराशिव आणि नांदेड या प्रमुख जिल्ह्यांमध्ये बंदचे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वाचे चौक, महामार्ग आणि सरकारी कार्यालयांच्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या बंदला प्रतिसाद मिळत असून सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये आज शुकशुकाट दिसत आहे.
लातूर जिल्ह्यासह औसा, अहमदपूर आणि मुरुड परिसरातही बंदला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शाळा-महाविद्यालयांसह प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार ठप्प झाले असून आंदोलकांकडून रॅली काढण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी बंदचे आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असतानाही सरकारकडून शिष्टमंडळ पाठवले जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, लोहारा, उमरगा, भूम, परंडा, वाशी आणि कळंबसह विविध तालुक्यांमध्ये व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
नांदेडमध्ये मात्र बंदच्या आवाहनावरून संभ्रम निर्माण झाला आहे. एका गटाने आज, 3 सप्टेंबर रोजी बंद आणि रास्ता रोकोची हाक दिली आहे, तर दुसऱ्या गटाने 4 सप्टेंबरला जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.
दरम्यान, कंधार येथे मराठा कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून 'शोले' स्टाईल आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणावर लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे. प्रशासनाने मात्र आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.