Baramati bypoll political debate : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून काँग्रेस नेत्यांची मनधरणी केली जात आहे. काँग्रेसच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करताना महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल आहे, असे विधान केले होते.
नवी दिल्लीत मीडियाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोटनिवडणुकीवर आपली भूमिका स्पष्ट केली. निवडणुकीत उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार आहे, असे सांगतानाच पवारांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचेही काही कारण नसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी पार्थ पवारांच्या काँग्रेसबाबतच्या विधानावरही त्यांनी भाष्ट केले.
काय म्हणाले होते पार्थ पवार?
पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वासोबत बोलणार का, या प्रश्नावर बोलताना पार्थ पवार म्हणाले होते की, कुणासोबतही बोलणे झालेले नाही. काय करायचं, ते त्यांना कळायला हवे. ते काय करत आहेत, ते सगळ्यांना माहिती आहे.
सगळे मोठे लोकं आहेत, सगळ्यांना समजतं, काय चाललंय. त्यांनी विचार केला असेल, त्यांना करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात ते दिसेल, असा संताप पार्थ यांनी व्यक्त केला. आम्ही कोणाला फोन करणार नाही. जे काय नशिबात लिहिलंय ते बघू. फक्त मला वाईट वाटतंय की, महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल आहे, असे विधान पार्थ पवार यांनी केले होते.
शरद पवार यांना पार्थ पवारांच्या या विधानाबाबत प्रश्न विचारल्यानंतर सुरूवातीला त्यांनी स्मितहास्य केले. त्यानतंर ते म्हणाले, ‘राजकारणात महत्वाचे धोरणात्मक वक्तव्य करण्यासाठी परिपक्वता लागते. ती कितपत आहे, हे आज मी सांगू शकत नाही,’ असे विधान शरद पवार यांनी केले.
विलीनीकरणाची चर्चा नाही
शरद पवार यांनी आज विलीनीकरणाच्या चर्चेवरही पडदा टाकला. ते म्हणाले, आमच्यावतीने विलीनीकरणाची चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार हे करत होते. अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर ही चर्चा थांबली. प्रक्रिया थांबली. आता आमच्या पक्षात त्याची चर्चा राहिलेली नाही. विलीनकरणावर पाच-सहा बैठका झाल्या. आता ती चर्चा नाही. आता मला असं वाटतं की, आपण पक्षाचं काम सुरू करावं. माझ्या आजारपणामुळे खंड पडला आहे. आणखी काही दिवसांनी मला लोकांच्यात जायला काही अडचण येणार नाही, असे पवारांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.