Pune-Solapur Highway Rasta Roko Agitation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ujani AI Data Center : उजनीवरील एआय डेटा सेंटरच्या विरोधात 1 खासदार, 4 आमदार 3 माजी मंत्री, 1 माजी आमदार उतरले रस्त्यावर

Pune-Solapur Highway Rasta Roko Agitation : उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, तरंगता सौरप्रकल्प आणि एसएमआर प्रकल्पांविरोधात रांजणीत रास्ता रोको झाला. हजारो नागरिकांसह खासदार, आमदारांनी सहभाग घेत पर्यावरणाला धोका असल्याचा दावा करत विरोध दर्शवला.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 31 October : उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, तरंगता सौरप्रकल्प, स्मॉल मॉड्यूलर रिऍक्टर प्रकल्पांच्या विरोधात माढा तालुक्यातील रांजणी येथे पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात एक खासदार, चार आमदार, दोन माजी मंत्री, एक माजी आमदार आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेला हा डेटा सेंटर कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशारा या नेत्यांनी दिला.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरण परिसरातील प्रस्तावित प्रकल्पाच्या विरोधात सोलापूर-पुणे महामार्ग रांजणी येथे रोखून धरण्यात आला. या आंदोलनात आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण पाटील, नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, महादेव जानकर, माजी आमदार संजयमामा शिंदे, शिवसेना नेते संजय कोकाटे, शेकाप नेते डॉ. अनिकेत देशमुख, दिग्विजय बागल, साविताराजे भोसले सहभागी झाले होते.

शिवसेना नेते, आमदार बच्चू कडू यांनी फोनवरून संवाद साधून आंदोलनाला पाठिंबा दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हा प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात बोलणार असून असे धोकादायक प्रकल्प महाराष्ट्रात नको, अशी भूमिका मांडली.

आंदोलनात १० हजारांहून अधिक शेतकरी, महिला व मच्छिमार सहभागी झाले होते. आंदोलनामुळे १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली होती.

डेटा सेंटर गुजरातमध्ये न्या

खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, आम्ही विकासाला विरोध करतोय, असं तुम्हाला वाटत असेल तर डेटा सेंटरचे सर्व प्रकल्प गुजरातमध्ये न्या. विनाशकारी गुंतवणूक आम्हाला नकोच. उजनी धरण प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या योजना अद्यापही अपूर्ण आहेत. त्याला केंद्र आणि राज्य सरकारने निधी द्यावा. मात्र, उजनीवर होणारे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही.

प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा चालूच राहील

आमदार नारायण पाटील म्हणाले, डेटा सेंटरसारख्या प्रकल्पांमुळे शेती, उद्योग व मानवी जीवनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे कोणताही प्रकल्प उजनीवर उभा राहू देणार नाही. उजनीच्या सुरक्षितेला गंभीर धोका होत असल्याने प्रकल्प रद्द होईपर्यंत आमचा लढा चालूच राहील.

विश्वासात न घेता प्रकल्पास मंजुरी

लोकप्रतिनिधी असूनही आम्हाला विश्वासात न घेता प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे फायद्यापेक्षा तोटेच अधिक आहेत, त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी आमदार अभिजीत पाटील यांनी दिली.

एवढी गुप्तता का?

उजनीचे पाणी याअगोदरच वाटप झाले असून प्रस्तावित प्रकल्पांसाठी पाणी कुठून आणणार, या प्रकल्पाबाबत राज्य सरकार आणि प्रशासनाने गुप्तता का ठेवली, विनाशकारी प्रकल्प रद्द करा; अन्यथा व्यापक जनआंदोलन उभे करण्यात येईल, असे माजी आमदार संजय शिंदे यांनी सांगितले. या वेळी आमदार रोहित पवार, शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख यांनीही मार्गदर्शन केले.

प्रशासनाचे जनसुनावणीचे आश्वासन

जनसुनावणीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय या परिसरात कोणताही प्रकल्प होणार नाही, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना या वेळी देण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT