

Karad, 31 October : बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यामुळे मतदान प्रक्रियेबाबत लोकांमध्ये विश्वासार्हता दिसून आली. त्याचा सकारात्मक परिणाम या निवडणुकीत विजयाच्या रूपाने पाहायला मिळाला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत युवकांमध्ये सरकारविरोधात असलेला रोषही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून स्पष्टपणे दिसून आला, असे मत पुणे पदवीधर मतदार संघांच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांनी व्यक्त केले.
जेष्ठ नेते यशंतराव चव्हाण यांच्या कऱ्हाड (जि.सातारा) येथील समाधीस्थळी आमदार देशमुख-जाधव यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कऱ्हाडचे उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, प्रभाकर देशमुख, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, संगिता साळुंखे, अशोकराव पाटील, सौरभ पाटील, प्रणव ताटे, जाधव, प्रशांत यादव, नगरसेवक प्रविण पवार, सुहास पवार, कांबळे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार देशमुख-जाधव म्हणाल्या, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळापासून ऊर्जा घेऊन प्रचाराला सुरुवात केली होती. विजय मिळाल्यानंतरही त्यांच्या समाधिस्थळी जाऊन अभिवादन केले. यशवंतराव चव्हाण यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचविण्याचे काम यापुढील काळात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पदवीधर तरुणांसमोर अनेक समस्या असून त्यामध्ये रोजगाराचा प्रश्न सर्वांत गंभीर आहे. मतमोजणीदरम्यान अनेक तरुणांनी मतपत्रिकेवर ‘पदवी घ्यायची कशाला?’ असा सवाल लिहिल्याचे दिसून आले. यातून प्राथमिक शिक्षणापासून नोकरी मिळेपर्यंतच्या व्यवस्थेतील अडचणी अधोरेखित झाल्या आहेत.
सध्या पुणे-मुंबई या शहरांमध्ये रोजगाराचे मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण होत आहे. हे केंद्रीकरण थांबवून रोजगाराचे विकेंद्रीकरण करणे आणि प्रत्येक जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे. या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.