Solapur ZP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nominated Seat : सोलापूर झेडपीत स्वीकृतच्या 4 जागांसाठी भाजपचे 100 इच्छूक; पवारांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी भाजप मोठा डाव टाकणार?

Solapur Zilla parishad : सोलापूर जिल्हा परिषदेत सात स्वीकृत सदस्यांची निवड होणार असून भाजपला चार जागा मिळण्याची शक्यता आहे. चार जागांसाठी तब्बल शंभर इच्छुक असल्याने पक्षश्रेष्ठींसमोर मोठे आव्हान आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 03 September : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत ७ सदस्य स्वीकृत म्हणून निवडता येणार आहेत. त्यात सत्ताधारी भाजपच्या वाट्याला सर्वाधिक चार जागा मिळणार असून राष्ट्रवादी काँग्रेस एक, शिवसेना एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एक अशा जागा मिळण्याची शक्यता आहे. चार जागा असणाऱ्या भाजपकडे सर्वाधिक १०० इच्छूक आहेत, त्यामुळे झेडपीत स्वीकृत सदस्य निवडताना पक्षश्रेष्ठींचा कस लागणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला स्वीकृतची जागा मिळू नये, यासाठी भाजप स्थानिक विकास आघाड्यांना हाताशी धरून मोठा गेम खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आघाड्यांची भूमिकाही भाजपला अनुकूल अशीच आहे, त्यामुळे प्रत्यक्ष निवडीवेळी पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळणार का?, याची उत्सुकता आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६८ असून १० सदस्यांच्या मागे एक या तत्वानुसार सात सदस्यांची स्वीकृत म्हणून निवड होणार आहे. त्यातही सर्वाधिक ३८ जागा जिंकणाऱ्या भाजपच्या वाट्याला ४ चार जागा येण्याची शक्यता आहे. त्या चार जागांसाठी भाजपकडे सर्वाधिक १०० इच्छूक कार्यकर्ते आहेत, त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडताना सोलापूर भाजपच्या नेतेमंडळींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक, सरचिटणीस विकास वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र आमदार सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील, राम सातपुते यांची शिफारस महत्वाची ठरणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे हे जिल्ह्यातील नेतेमंडळींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपकडे इच्छुकांची मोठी गर्दी होती. त्यावेळी स्थानिक नेतेमंडळींनी मातब्बर इच्छुकांनी माघार घ्यावी, यासाठी संबंधितांना स्वीकृतचा शब्द दिलेला आहे. तसेच अनेकांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला झेडपीवर घेण्यासाठीही झुलवत ठेवले आहे, त्यामुळे नेमकी संधी कोणाला मिळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

स्थानिक विकास आघाड्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार

जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य निवडीच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील स्थानिक आघाड्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आमदार नारायण पाटील यांच्या करमाळा विकास आघाडीचे तीन, भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे एक आणि सांगोला विकास आघाडीचे दोन सदस्य आहेत, त्यामुळे विरोधकांची एक जागा कमी करण्यासाठी भाजप या आघाड्यांना हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला स्वीकृतपासून दूर ठेवू शकतो, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT