

Satara, 03 September : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणेही वेगाने बदलताना दिसत आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुल भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कराडमधील नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उंडाळकरांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्याचा प्रयत्न भोसलेंकडून होताना दिसत आहे. आमदार भोसले यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा जिल्हा बॅंकेतील प्रवेश कठीण होणार आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत सहकारी सोसायटी मतदारसंघाची भूमिका अत्यंत कळीची ठरते. या मतदासंघातून बहुतांश वेळा मंत्री, आमदार, खासदार, ज्येष्ठ नेत्यांनी बॅंकेत जाणे पसंत केले आहे, त्यामुळे हा दिग्गजांचा मतदारसंघ ठरतो. या मतदारसंघात बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे सर्वाधिक मते असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे भाजप स्वबळावर लढवणार की महायुती म्हणून निवडणूक लढणार, यावर बरीच समीकरणे अवलंबून आहेत.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार डॉ. अतुल भोसले आणि डॉ. सुरेश भोसले यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी घेतली. त्याचा डॉ भोसले यांना निवडणुकीत फायदा झाला. मात्र, त्या वेळी झालेल्या चर्चेनुसार जिल्हा बॅंकेला भोसले गटाने उंडाळकर यांना मदत करण्याचा शब्द दिल्याचे सांगितले जाते, त्यानुसार आता भोसले गटाने उंडाळकरांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार अतुल भोसले यांनी तसे जाहीरपणे बोलून दाखवले आहे.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कऱ्हाडमधून ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना पाठिंबा देणार आहोत. त्यांना सोबत घेऊनच आम्ही काम करत आहोत, असे आमदार डॉ. भोसले यांनी स्पष्ट करत भाजपचा स्वतंत्र पॅनेल झाला तरीही ॲड. उंडाळकर आमच्यासोबत येतील. सहकारी संस्थांच्या निवडणुका थोडीच पक्षाच्या चिन्हावर होतात, त्यामुळे ॲड उंडाळकर भाजपसोबत असतील, असेही आमदार भोसले यांनी जाहीर केले.
आमदार डॉ. अतुल भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही गटाची या मतदारसंघातील ताकद ही माजी मंत्री पाटील यांच्यापेक्षा मोठी मानले जाते. त्यामुळे बाळासाहेब पाटील यांना बॅंकेत पुन्हा संचालक म्हणून जाणे अवघड मानले जात आहे.
मागील निवडणुकीत आमदार भोसले गट हा माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत होता. त्यामुळे त्या निवडणुकीत ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव झाला होता. खरं तर उदयसिंह उंडाळकर यांचे पिताश्री आणि माजी मंत्री (स्व.) विलासकाका पाटील उंडाळकर यांनी तब्बल 50 वर्षे सहकारी सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून काम केले होते. मात्र, त्यांच्याच मुलाला मागील निवडणुकीत तीन मतांनी पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे उंडाळकर गटाने गेली वर्षभरापासून बॅंकेसाठी मोर्चोबांधणी केली आहे.
कऱ्हाड सोसायटी मतदारसंघात 146 मते आहेत. उंडाळकर आणि माजी मंत्री पाटील या दोन्ही गटाची ताकद या मतदारसंघात मोठे आहे. मात्र, विजयाची चावी भोसले गटाकडे असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे भोसले ज्यांच्या पाठीशी उभे राहतात, तो सातारा जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून निवडून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उंडाळकर यांचे पारडे तुलनेने जड मानले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.