Solapur, 25 May : विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आजपासून (ता. 25 मे) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. येत्या एक जूनपर्यत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. पहिल्याच दिवशी पाच राजकीय पक्षांसह अपक्षांनी एकूण १४ अर्ज नेले आहेत. भाजप, राष्ट्रवादी वगळता इतर सर्व पक्षांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. भाजपकडून कोण उमेदवारी अर्ज भरणार, याची उत्सुकता आहे.
गेली चार वर्षांपासून रखडलेल्या विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक १८ मे रोजी जाहीर झाली आहे. त्यानुसार आजपासून उमेदवारी अर्जाची विक्री आणि स्वीकृतीस सुरुवात झाली आहे. उमेदवार अर्ज भरण्याचा १ जून हा शेवटचा दिवस आहे, तर २ जून रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. माघारीचा अंतिम दिवस हा ४ जून आहे. मतदान १८ जून रोजी असून मतमोजणी २२ जूनला होणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एकूण 14 अर्जांची विक्री झाली आहे. यात काँग्रेस पक्षाकडून 02, शिवसेनेकडून (शिंदे गट) 04, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 03, राष्ट्रीय समाज पक्षाने 01, बहुजन समाज पार्टी 01, तर तीन अपक्षांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. अर्ज खरेदीसाठी 100 रुपये शुल्क ठेवण्यात आलेले आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपकडे स्पष्ट बहुमताचे संख्याबळ आहे. एकट्या भाजपकडे 313 मतांचे संख्याबळ आहे, त्यामुळे सोलापूर मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपकडे जाणार, हे स्पष्ट आहे. मात्र उमेदवारीसाठी पक्षात मोठी चुरस आहे.
माजी आमदार प्रशांत परिचारक, राम सातपुते, राजेंद्र राऊत, राजन पाटील आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, परवा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांचे नाव अचानकपणे आघाडीवर आले आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षाकडे 57 जागांचे संख्याबळ आहे, त्यामुळे महाआघाडीकडून उमेदवार दिला जाणार का, याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडे 04, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 27, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 26 असे एकूण 57 जागा आहेत, त्यामुळे महाआघाडी भाजप महायुतीला टक्कर देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.