

Satara, 25 May : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चोबांधणी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या मतदारसंघात तुल्यबळ असल्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष असणार आहे. महायुती ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता असून भाजपकडून चार नावे मंजुरीसाठी हायकमांडकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. आता भाजपश्रेष्ठींकडून या चार नावांना हिरवा कंदील दाखवला जातो की नवे नाव जाहीर केले जाते, याची उत्सुकता आहे.
मागील निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अटीतटीची लढत झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेखर गोरे यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरवले होते, तर काँग्रेसकडून पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम हे निवडणूक लढवत होते. त्या निवडणुकीत मोहन कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर गोरे यांचा पराभव केला होता, त्यामुळे या वेळी उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आहे.
या मतदारसंघात भाजपकडे ३१४ मतदार असून, त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस २०५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ११९, शिवसेना १११, काँग्रेस ७३, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १ असे राजकीय पक्षांचे संख्याबळ आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यात आघाड्या आणि अपक्षांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महायुतीत सातारा-सांगलीची जागा ही भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत झाली. त्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सांगली जिल्ह्यातील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सम्राट महाडिक यांची, तर सातारा जिल्ह्यातून शेखर गोरे आणि धैर्यशील कदम यांची नावांवर विचार करण्यात आला.
भाजपकडून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सम्राट महाडिक, शेखर गोरे आणि धैर्यशील कदम यांची नावे उमेदवारीसाठी केंद्रीय निवड समितीकडे पाठविण्यात आली आहेत. या नावांना मंजुरी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे चार नेत्यांना कागदपत्रे तयार ठेवण्याची सूचना देण्यात आलेली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून या चार नावांपैकी एका नावावर मंजुरीची मोहोर उमटवून घेण्याचा प्रयत्न सांगली, सातारा जिल्ह्यासह प्रदेश कार्यालयाकडून सुरू आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीचा सस्पनेस वाढला आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.