Chandgad Assembly Election 2024 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Election 2024 : चंदगडमध्ये विधानसभेसाठी तिरंगी लढत, 18 उमेदवार रिंगणात

सरकारनामा ब्युरो

Chandgad News, 13 Sep : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चंदगडमधून 18 उमेदवार रिंगणात आहेत. अनेक पक्षांचे विविध उमेदवार रिंगणात उतरले असले तरी प्रत्यक्षात मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यातच लढत होणं अपेक्षित आहे.

उर्वरित पंधरापैकी सहा-सात उमेदवार आपापल्या परीने मतदारांची मते पदरात पाडून घेतील. लहान-मोठ्या गटांना मिळालेली मते ही प्रमुख पक्षांच्या जय-पराजयासाठी कारणीभूत ठरणार आहेत. सध्या राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर (MLA Sandhyadevi Kupekar) या त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतं मागत आहेत.

दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांनी सुरवातीच्या काळात केलेली कामे आणि त्यापाठोपाठ संध्यादेवी यांनी विकास कामे करण्यावर चांगलाच भर दिला आहे. त्यामुळे ही विकास कामे त्यांना निवडणुकीत फायद्याची ठरू शकतात. पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांनी घरातूनच नेतृत्वाला आव्हान दिले आहे. याच पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अप्पी पाटील यांनीही बंडखोरी केल्यामुळे मतांची विभागणी होणार आहे.

शिवसेनेकडून (Shivsena) माजी आमदार नरसिंगराव पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर 14 वर्षे त्यांच्याविरोधात राहिलेले मेहुणे गोपाळराव पाटील यांनी त्यांना मदत केली होती. ते स्वतः प्रचार कार्यात सहभागी झाले होते. गडहिंग्लज आणि आजरा विभागातूनही त्यांना बऱ्यापैकी मदत अपेक्षित आहे.

माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) उमेदवार भरमू पाटील यांचा चंदगड-आजरा तालुक्‍यात चांगला गट आहे. गडहिंग्लज भागातूनही त्यांना लोकांचे सहकार्य आहे. 1995 नंतर सत्तेपासून वंचित राहिलेल्या या गटाचा कार्यकर्ता ही वेळ साधण्यासाठी मनापासून कामाला लागला आहे.

जनसुराज्य शक्ती पक्षाचे संग्रामसिंह कुपेकर, अपक्ष संभाजीराव देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यान्नावर, अपक्ष अप्पी पाटील, नितीन पाटील, जनता दलाच्या स्वाती कोरी, शेतकरी कामगार पक्षाचे रवींद्र पाटील, भारीप बहुजन संघाचे दत्तात्रय अत्याळकर, मोहन कांबळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवाकर पाटील यांनी आपापल्या परीने नियोजन लावले आहे. या प्रत्येकाचे त्या त्या विभागात स्वतःचे म्हणून मतदार आहेत. त्यांच्याकडून घेतली जाणारी मते ही कोणाच्या तरी विजयाला किंवा पराभवाला कारणीभूत ठरणारी असतील. 19 तारखेला निकालानंतरच त्याचे अनुमान करणे शक्‍य होईल.

चिन्हांमुळे कोणाला ताण

तर यंदाच्या निवडणुकीत चिन्हांमुळे प्रचाराचा ताण कमी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची चिन्हे जनमाणसात परिचित आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचाराचा मोठा ताण कमी झाला आहे. उर्वरित उमेदवारांना चिन्ह समजावून देण्यातच मोठा वेळ घालवावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय मते मिळवण्यात चिन्हांची निवडही खूप महत्वाची असते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT