Pandharpur, 27 July : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीच्या काळात 24 ते 26 जुलैदरम्यान तब्बल ३२ लाख वारकऱ्यांनी हजेरी लावली. सोलापूर जिल्हा पोलिसांनी गर्दीचे व्यवस्थापन करतानाच अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तीन दिवसांत पंढरपुरातील वारकऱ्यांची अचूक मोजणी केली आहे.
यंदाच्या आषाढी वारीत जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेंटियंट लॉजिक्स’ या संस्थेच्या मदतीने अत्याधुनिक 'कॉग्निटिव्ह व्हिज्युअल ह्युमन न्यूरल एआय' तंत्रज्ञानाचा वापर वारकऱ्यांची मोजणीसाठी करण्यात आला. त्यात 31 लाख 98 हजार 129 (सुमारे ३२ लाख) वारकऱ्यांची अचूक नोंद झाली आहे.
एआय प्रणालीने केलेल्या अचूक मोजणीनुसार तीन दिवसांत पंढरपुरात 24 जुलै रोजी 6 लाख 75 हजार 274, ता. 25 जुलै रोजी (आषाढी एकादशी) 18 लाख 96 हजार 573, तर 26 जुलै रोजी 6 लाख 26 हजार 282 वारकरी असे एकूण 31 लाख 98 हजार 129 वारकऱ्यांची नोंद पंढरपुरात झाली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच 25 जुलै रोजी सर्वाधिक सुमारे 19 लाख वारकरी पंढरपुरात आल्याचे या नोंदीवरून स्पष्ट होते. पारंपरिक कॅमेऱ्यामध्ये एकच व्यक्ती विविध कॅमेऱ्यांसमोर आल्यास आकडेवारी फुगते. मात्र, एआय प्रणालीचा वापर करण्यात आल्याने ही दुबार नोंदणी पूर्णपणे टाळली गेली आहे.
मुख्य प्रवेशद्वारांवर एआय आयडेंटिटी
सरगम चौक ते इंदिरा गांधी चौक, तीन रस्ता ते दगडी पूल, गोपाळपूर पूल, सावरकर चौक व मिलिटरी हॉस्टेल आणि सांगोला चौक एन्ट्रीचा पाचव्या मुख्य मार्गांवर एआय कॅमेरे बसवण्यात आले होते. व्यक्तीचा चेहरा, कपड्यांचा रंग आणि टोप्यांचा ताळमेळ लावून या कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक वारकऱ्यांची एक 'युनिक एआय ओळख' तयार केली जात होती.
क्रॉस-कॅमेरा ट्रॅकिंग व पुनर्प्रवेश पडताळणी
वारकरी शहरात फिरताना इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी त्यांना न मोजता एकाच ओळखीने ट्रॅक केले. तसेच, शहराबाहेर जाऊन पुन्हा प्रवेश करणाऱ्या भाविकांची जुन्या नोंदीशी पडताळणी करून दुबार मोजणी रोखण्यात आली.
नागरिकांच्या गोपनीयतेचे पालन
या मोजणीदरम्यान भाविकांच्या गोपनीयतेची पूर्ण दक्षता घेण्यात आली. भारताचा ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट (डीपीडीपी) आणि जीडीपीआर नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीचा फोटो किंवा वैयक्तिक माहिती सर्व्हरवर सेव्ह करण्यात आलेली नाही.
गर्दी व्यवस्थापनासाठी फायदा होणार
पंढरपूर आषाढी वारी हा भारतातील मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि योग्य नियोजनासाठी अचूक आकडेवारी आवश्यक असते. त्यासाठी सोलापूर जिल्हा पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे 32 लाख युनिक भाविकांची अचूक नोंद केली आहे. याचा फायदा भविष्यात गर्दी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होणार आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.