Rajendra Patil Yadravkar
Rajendra Patil Yadravkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : राज्यात कोरोना (Corona) विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश लागू केले आहेत. मात्र, ते आदेश मोडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील (Kolhapur District Bank Election) विजयाची मिरवणूक काढल्याबद्दल राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांच्यासह तिघा विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मतमोजणी पार पडल्यानंतर अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. अनेक विजयी उमेदवारांनी मिरवणूका काढल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला असतानाही शनिवारी (ता.९) जयसिंगपूर येथील क्रांती चौक ते गल्ली नंबर सहा दरम्यान विजयी मिरवणूक काढली. यात जेसीबीच्या (JCB) साह्याने गुलालाची उधळण करण्यात आली.

याबाबत टीकेची झोड उठविण्यात आल्यानंतर रविवारी त्याची दखल घेत पोलिसांनी उमेदवार व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. जयसिंगपूर येथे मिरवणूक काढल्याबद्दल आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, त्याचे बंधू संजय पाटील यांच्यासह ४०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. तसेच शाहुवाडी येथे संतोष पाटील, रोहित कांबळे यांच्यासह ६० जणांविरुद्ध तर वडगाव येथे विजयी उमेदवार विजयसिंह अशोक मानेसह अन्य कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या शिरोळ तालुका विकास संस्था गटातून राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांनी मोठ्या मताधिक्याने विजय नोंदवला. राजेंद्र यड्रावकर यांना ९८ मते मिळाली, तर विरोधातील उमेदवार आणि शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील (Ganpatrao Patil) यांना ५२ मते पडली. या निकालामुळे यड्रावकर आता शिरोळचे आमदार, राज्य सरकारमध्ये मंत्री आणि स्थानिक राजकारणावर पकड ठेवत जिल्हा बँकेवर संचालकही झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे दोन पराभव पाहिलेले यड्रावकर अवघ्या दोनच वर्षात विरोधकांना पुरुन उरले असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT