Kolhapur North Vidhansabha Constituency  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur North : महायुतीत धुसफूस अन् महाविकास आघाडीत ठिगणी, कोल्हापूर 'उत्तर' कुणाला मिळणार?

Kolhapur North Vidhansabha Constituency : कोल्हापूर उत्तर विधानसभा संघावरून दोन्ही आघाड्यांमध्ये राजकीय घमासान सुरू आहे. महायुती मधील शिवसेना शिंदे गट आणि भाजप या जागेवर ठाम आहे. तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट देखील आक्रमक झाला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पहिली यादी जाहीर केल्यानंतर काल महायुती मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील काही विद्यमान आमदारांना एबी फॉर्म दिले आहेत. जवळपास निम्म्याहून अधिक जागांवरील महायुती आणि महाविकास आघाडीतील घोळ सुटल्यानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभा संघावरून दोन्ही आघाड्यांमध्ये राजकीय घमासान सुरू आहे.

महायुती मधील शिवसेना शिंदे गट आणि भाजप या जागेवर ठाम आहे. तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट देखील आक्रमक झाला आहे. दिवसेंदिवस महाविकास आघाडी मधील उद्रेक या जागेवरून बाहेर येत आहे. तर महायुतीच्या नेत्यांनी मुंबईकडे धाव घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

महायुतीमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक, भाजपचे माजी महानगराध्यक्ष राहुल चिकोडे हे तिघेजण इच्छुक आहेत.

तर शिवसेना शिंदे गटाकडून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर मैदानात उतरले आहेत. महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेली असल्याचे सांगितले जाते. मात्र कोल्हापूर उत्तर आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

अशातच माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. तर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन क्षीरसागर यांचे टेन्शन वाढवले आहे. मात्र क्षीरसागर यांनी देखील ही जागा आपल्यालाच मिळणार असा दावा केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ सर्व पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलावले असल्याने कोल्हापूर उत्तरचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाच्या पारड्यात पडणार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच सांगू शकतील. जर उमेदवारी शिरसागर यांना गेल्यास कदम यांच्याकडून परिवर्तन महाशक्तीचा पर्याय स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींवर जिल्ह्यातील महायुतीचे नेते कोणता मार्ग काढण्यात याकडे देखील जिल्ह्याचे लक्ष आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हीच परिस्थिती आहे. कोल्हापूर उत्तर वरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर काँग्रेसकडून आमची मुस्काटदाबी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला आहे. विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्याने ही जागा काँग्रेसच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे.

मात्र ठाकरे गटाचा दावा ठाम असल्याने या मतदारसंघातून उमेदवारीचा पेज कायम आहे. शिवाय जागा काँग्रेसला गेल्यात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने देखील सर्वच पदाधिकारी तात्काळ मुंबईला बोलवल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. त्यामुळे आज सायंकाळापर्यंत या मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT