Abhijeet Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : अभिजीत पाटलांचा विठ्ठल परिवारातील नेत्यांवर हल्लाबोल; ‘त्यांनी ज्याला जवळ घेतलं, त्यालाच हाबडा दिला..’

Abhijeet Patil Statement : (स्व.) यशवंतभाऊ पाटील, राजूबापू पाटील आणि भोसे गावातील जनता ही शरद पवार यांच्या विचारांची आणि त्यांच्यावर प्रेम करणारी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राजूबापू पाटील यांच्यापर्यंत ही परंपरा सुरू होती.

Vijaykumar Dudhale

Solapur, 04 January : विठ्ठल कारखान्याचा चेअरमन आमदार होऊ देणार नाही, हे त्यांनी पोटनिवडणुकीत खरं करून दाखवलं. पण, माझ्यावर त्यांचं औषध चाललंच नाही. माझ्या पाठीशी सामान्य जनता होती. या लोकांनी नेमकं कोणाचं नुकसान केलं. ते नेमकं कुणाला म्हणत होते, त्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. ते म्हणायचे जवळ घेऊन हाबडा द्यायचा. मी त्यांच्या जवळच गेलो नाही, त्यामुळे मला हाबडा द्यायचा प्रश्नच नाही. पण, ज्याला जवळ घेतलं, त्याला त्यांनी हाबडा दिला, अशा शब्दांत माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी विठ्ठल परिवारातील नेत्यांवर नाव न घेता हल्लाबोल केला.

पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील भोसे गावात नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विठ्ठल परिवारातील काही नेत्यांनी जवळ घेऊन हाबडा द्यायचा असे विधान केले होते, त्याचा संदर्भ घेऊन आमदार अभिजीत पाटील यांनी माढ्यातील विजयाबाबत भाष्य केले.

आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) म्हणाले, (स्व.) यशवंतभाऊ पाटील, राजूबापू पाटील आणि भोसे गावातील जनता ही शरद पवार यांच्या विचारांची आणि त्यांच्यावर प्रेम करणारी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राजूबापू पाटील यांच्यापर्यंत ही परंपरा सुरू होती. मात्र, मागील काही दिवसांत येथील काही लोकांनी चुकीचा विचार केला आणि त्या माध्यमातून गावात वेगळ्या पद्धतीचे वातावरण तयार करण्यात आले. पण भोसे गावची जनता शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विचारांची आहे, हे पावणे सहाशे मतांचे लीड देऊन पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

महायुतीतून न लढण्याचा परिणाम झाला आहे, असे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी बोलणं सहाजिक आहे. माझी लढत ही रणजितसिंह शिंदे यांच्या विरोधात झालेली आहे. माझ्याविरेाधात जोपर्यंत रणजित शिंदे बोलत नाहीत, तोपर्यंत बबनराव शिंदे हे मार्गदर्शक आहेत. ते योग्य तेच सांगत असतील. त्यांच्यावर बोलण्याएवढा मी मोठा नाही, असेही अभिजीत पाटील यांनी नमूद केले.

ज्या शिवाजीराव कांबळेंनी सांगितलं की 107 गावांनीच विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह शिदे यांचा घात केला. दुसरं एक जण म्हणाले की, इथं बसलेल्या लोकांनीच घात केला. आता हे बोलणारे दोघेही ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचं खरं असू शकतं, असं पाटील यांनी स्पष्ट केले.

मुळात कोणी कोणाचा घात केला, हेच त्यांनी आता पाच वर्षे तपासात राहावं. मी मात्र जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्याचे काम करणार आहे. भोसे, बावीला पाणी आणणे. अंजनगाव, परिते, करकंब येथील पाणी, शेतीचे प्रश्न सोडविणे आणि भोसे येथे नगरपरिषद करण्यासंदर्भातही आपल्याला काम करायचे आहे. काम करत राहणे, एवढाच सपाटा आता आपल्याला लावायचा आहे, अशी भूमिकाही आमदार पाटील यांनी मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT