Bhagirath Bhalke-Radhakrishna Vikhe Patil
Bhagirath Bhalke-Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पवारांच्या स्वागताला दांडी मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या भालके-काळेंनी केले भाजप मंत्र्यांचे स्वागत!

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर (Pandharpur) विधानसभा पोटनिवडणूक आणि विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये (NCP) मरगळ आली आहे. त्यातच पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने पंढरपुरात राष्ट्रवादीचा पाय अधिकच खोलात गेला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादीला पुन्हा गळती लागते की काय, अशी चर्चा सुरु असतानाच पंढरपुरातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते भाजप (BJP) मंत्र्यांच्या (Minister) स्वागताला हजेरी लावत असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. (Absence of Rohit Pawar's reception; But the BJP minister was welcomed by Bhalke and Kale)

मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी त्यांच्या स्वागताला दांडी मारली होती. परंतु आज महसूल मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वागताला मात्र त्यांनी अवर्जून हजेरी लावली. भाजप मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या वाढत्या जवळीकतेमुळे अनेक तर्कविर्तक लढवले जात आहेत.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांचा पराभव झाला. त्यानंतर झालेल्या विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीत भालके-काळे गटाच्या पदरी पराभवच आला. सलग दोन पराभवामुळे पंढरपुरातील राष्ट्रवादीमध्ये मरगळ आली आहे. त्यातच अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादी सध्या बॅकफूटवर गेली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके, कल्याणराव काळे यांची भाजप नेत्यांशी जवळीक वाढली आहे, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दुरावा वाढल्याची चर्चा आहे.

अलीकडेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके पंढरपुरात असूनही त्यांनी त्यांच्या स्वागताला दांडी मारली होती. कल्याणराव काळे हे देखील सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून अंतर ठेवून आहेत. महसूलमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंगळवारी पंढरपुरात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके, कल्याणराव काळे आवर्जून त्यांच्या स्वागतासाठी शासकीय विश्रामगृहावर हजर होते.

दरम्यान, आठ दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे पंढरपूला आले होते. त्यावेळीही राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांनी आवर्जून मंत्र्यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार केला होता. त्यानंतर मंगळवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या स्वागताला भालके-काळे या दोन्ही नेत्यांनी आवर्जून हजेरी लावल्याने पंढरपूर तालुक्यात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT