jayant patil
jayant patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

त्यानंतर मोहोळचा कारभार कुणाकडेही द्या; त्यास माझी हरकत नाही : राजन पाटील

राजकुमार शहा

मोहोळ (जि. सोलापूर) : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) तसेच, अजितदादांनी (ajit pawar) राष्ट्रवादीच्या माध्यमातून माझ्यासह मोहोळ तालुक्याला भरपूर दिले आहे, त्यांचा तालुक्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. भोगावती जोड कालव्याचे काम आणि आष्टी तलावातील पाणी खंडाळीच्या चढावर आणून सोडल्यास त्याचा तालुक्यातील अनेक गावांना फायदा होणार आहे. एवढे काम झाल्यानंतर मोहोळ तालुक्याचा कारभार कुणाकडेही द्या, त्याबाबत आमची हरकत नाही, अशा शब्दांत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी तालुक्यातील राजकीय चढाओढीवर अप्रत्यक्ष भाष्य केले. (Accept our two things and then give the responsibility of Mohol to anyone: Rajan Patil)

राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मोहोळ येथे आले होते. त्या कार्यक्रमात राजन पाटील बोलत होते. ते म्हणाले की, राष्ट्रवादी ही सत्तेतील भागीदारी असणारा पक्ष आहे. पण आम्हाला जेवढं कळतं त्यानुसार सर्वकाही राष्ट्रवादीच चालवते असे वाटते. मी आज तुमच्यापुढे तालुक्यातील प्रश्नांचा उलगडा करतो. तो जर मी केला नाही तर आता जे शिट्ट्या वाजवत आहेत, ते उद्या मला जाब विचारल्याशिवाय सोडत नाहीत. आमच्या तालुक्याचे तीन महत्वाचे प्रश्न आहेत. त्यातील एक म्हणजे सीना भोगावती जोड कालवा काम करून त्याला पाणी सोडले तर मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

आष्टी तलावातील जे उपलब्ध पाणी आहे. त्यातील काही तसेच शिरापूर उपसा सिंचन आणि आष्टी योजनेचे वाहून जाणारे पाणी खंडाळी गावच्या चढावर पाईपलाईनद्वारे पाणी सोडले, तर आमच्या तालुक्यातील अवर्षणप्रवण गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे, अशी मागणी राजन पाटील यांनी स्वागतपर भाषणात केली.

जयंत पाटील म्हणाले की, सन 2023 पूर्ण होण्याअगोदर मोहोळ तालुक्यातील निधीअभावी रखडलेल्या आष्टी व शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी इंजिनियर मागतील तेवढा निधी देऊ. तसेच, सीना भोगावती या जोड कालव्यासाठी लागणारे पाणी उपलब्ध आहे की नाही याचा अभ्यास सुरू आहे, त्याचा अहवाल आल्यावरच त्याबद्दल निर्णय घेण्यात येईल. आष्टी तलावातून नऊ गावांना पाणी देण्यासाठीचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी पालकमंत्री भरणे म्हणाले, कोरोनाच्या काळात तिजोरीत खडखडाट असतानासुद्धा सर्वसामान्याला मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. मुख्यमंत्री सडक योजनेतून राज्याला ९०० किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले आहेत जिल्ह्याची जिरायत अशी असलेली ओळख पुसण्यासाठी राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मोठी मदत होते आहे.

आमदार यशवंत माने म्हणाले, गेल्या पाच वर्षापेक्षा महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठी कामे झाली आहेत. मोहोळ मतदार संघासाठी आत्तापर्यंत ४७२ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. मोहोळ शहरासाठी आष्टी तलावातून पाणी पुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र राहिले आहे, ते मिळाले तर शहराचा कायमचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे.

या वेळी पालकमंत्री दत्ता भरणे, आमदार यशवंत माने, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, दीपक साळुंखे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, युवक अध्यक्ष महबूब शेख ,रविकांत विरपे, सुनील गव्हाणे, निरंजन भूमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार राजन पाटील, महेश कोठे, दिलीप कोल्हे, विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील, प्रकाश चवरे, विद्या लोळगे, दिपाली पांढरे आदीसह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT