पंढरपूर : बूथ कमिट्या, कार्यकारिणी सदस्य आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर न केल्याने संतप्त झालेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. याचदरम्यान पक्षाच्या मेळाव्याकडे पाठ फिरवणाऱ्या दांडीबहाद्दर पदाधिकाऱ्यांचीही त्यांनी आपल्या खास शैलीत हजेरी घेतली. घरात बसून पक्षाचे धोरण ठरवणाऱ्या चमकोगिरी कार्यकर्त्यांना बाजूला सारून रस्त्यावर उतरून पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना यापुढे संधी द्या, अशी सूचना पाटील यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (baliram sathe) यांना दिली. (Jayant Patil got angry as the booth committee's was not appointed)
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता. २१ फेब्रुवारी) पंढरपुरात परिवार संवाद मेळावा पार पडला. या वेळी पाटील यांनी मजबूत पक्ष संघटन कसे असावे, या विषयी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी पाटील यांनी मंगळवेढ्याचे तालुका अध्यक्ष बी. पी. पाटील व पंढरपूरचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांना बूथकमिट्या आणि कार्यकारणीच्या निवडी विषयी माहिती विचारली असता, बूथ कमिट्या नेमल्या नसल्याचे समोर आले.
पक्षाच्या मेळाव्याला कार्यकारणीतील किती सदस्य उपस्थित आहेत, याचाही त्यांनी आढावा घेतला असता, निम्याहून अधिक पदाधिकारी गैरहजर असल्याचे दिसताच पाटील यांनी दांडीबहाद्दर पदाधिकाऱ्यांना काम करण्याची इच्छा नाही, असे समजून पक्षाचे प्रमाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्या, अशी सूचनावजा आदेशही जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना दिले.
पंढरपुरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमधील मतभेद मिटले आहेत. यापुढे मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी जोमाने काम करणार आहे. कारखान्याकडे 1 लाख 9 हजार साखर पोती शिल्लक आहेत. परंतु राज्य सहकारी बँकेच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे ऊस बिल थकल्याचे भगिरथ भालके यांनी सांगितले.
मेळाव्याला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेश अध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा युवकचे अध्यक्ष गणेश पाटील, कल्याण काळे, दीपक पवार, शहराध्यक्ष स्वप्नील जगताप, शहराध्यक्ष सुधीर भोसले, पंढरपूर विधानसभा अध्यक्ष संदीप मांडवे, मारुती जाधव, सुभाष भोसले, महिला तालुका अध्यक्ष राजेश्री ताड, संगीता माने आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.