Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नरेंद्र मोदी यांनी 34 वर्षांनंतर देशाला नवे शैक्षणिक धोरण दिले

सरकारनामा ब्युरो़

अहमदनगर - लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेची सहविचार सभा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आली होती. या प्रसंगी आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी नव्या शैक्षणिक धोरणा संदर्भात विचार मांडले. ( After 34 years, Narendra Modi gave a new educational policy to this country )

या सहविचार सभेला माजी मंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, संस्‍थेचे नवनियुक्‍त संचालक निवृत्‍त सनदी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, अण्‍णासाहेब भोसले, डॉ. भास्‍करराव खर्डे, शांतिनाथ आहेर, दत्‍त पाटील शिरसाठ, मच्छिंद्र पावडे, भाऊसाहेब जऱ्हाड, रोहिणी निघुते, अॅड. पोपटराव वाणी, किशोर नावंदर, संस्‍थेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण अधिकारी लिलावती सरोदे आदी उपस्थित होते. या सहविचार सभेच्‍या निमित्‍ताने विविध क्षेत्रात पीएच.डी. प्राप्‍त प्राध्‍यापकांचा सन्‍मान तसेच निवृत्‍त सेवकांचा कृतज्ञता सोहळा झाला.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, गुणवत्‍तापूर्ण शिक्षणाबरोबरच नवीन तंत्रज्ञानाने शिक्षणाचा मूलभूत पाया विकसीत करावा लागेल. भविष्‍यात परदेशी विद्यापीठांशीच आपली स्‍पर्धा आहे. यासाठी नव्या राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार कृतीत उतरवूनच शैक्षणिक संस्थांना मार्गक्रमण करावे लागेल, असे मत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचे अध्यक्ष आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

आमदार विखे पाटील पुढे म्हणाले की, इंग्रजी भाषेचा आग्रह पद्मश्रींनी 1964 सालीच धरला. अतिशय दुरदृष्‍टीने त्‍यांनी मानलेला विचार आज सर्वांनिच स्वीकारला. काळाच्‍या ओघात शिक्षण व्यवस्‍‍थेमध्‍ये झालेले बदल सर्वांनाच स्वीकारणे भाग पडले. हीच परिस्थिती अभियांत्रिकी शिक्षणाच्‍ वेळी निर्माण झाली होती. ग्रामीण भागातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करताना झाली होती. परंतु पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करुन खासदार बाळासाहेब विखे पाटल यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना अभियांत्रिकी शिक्षणाचा मार्ग मोकळा करुन दिला. याचे सकारात्‍मक परिणाम आपल्‍याला आज पाहायला मिळत आहे. प्रवरा शिक्षण संकूलातून शिक्षण घेवून बाहेर गेलेले विद्यार्थी जगाच्‍या कानाकोप-यात विविध क्षेत्रात करीत असलेले यशस्‍वी काम हीच खरी प्रवरा संस्‍थेची उपलब्‍धी आहे, असे त्‍यांनी नमुद केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 34 वर्षांनंतर या देशाला नवे शैक्षणिक धोरण दिले. या धोरणामध्‍येच प्रत्‍येक व्‍यक्तीच्‍या क्षमतांचा विकास करण्‍याचा विकास अंतर्भूत केला आहे. त्‍या दृष्‍टीने आता बदललेली शैक्षणिक रचना गृहीत धरुन गुणात्‍मक शिक्षणाबरोबरच कौशल्‍यपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आपल्‍या सर्वांवर येवून पडली आहे, याकडे लक्ष वेधून भविष्‍यात परदेशी विद्यापीठांचे कॅम्‍पस आपल्‍याकडे सुरु होणार आहेत. त्‍यांच्‍याशी स्‍पर्धा करताना शिक्षणाचा दर्जा कायम राखताना स्‍वंयरोजगाराची निर्मिती शिक्षणातून कशी निर्माण होईल हा विचार कृतीत उतरवावा लागणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने नेहमीच नव्‍या बदलांचा स्वीकार करुन, मार्गक्रमण केले आहे. येणाऱ्या काळात स्‍पर्धा परीक्षांचा प्रवरा पॅटर्न सुरु करतानाच संस्‍थेचे प्रत्‍येक शाळा आणि महाविद्यालय डिजीटल करुन, विद्यार्थ्‍यांसाठी मोफत अभ्‍यासिकेची उभारणी करण्‍याची घोषणा आमदार विखे पाटील यांनी या सहविचार सभेमध्‍ये केली. माजीमंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांनी संस्‍थेच्‍या वाटचालीचा इतिहास विषद करुन, कोविड संकटातही संस्‍थेतील शिक्षक आणि प्राध्‍यापकांनी विद्यार्थ्‍यांचे शैक्षणिक नूकसान होवू नये म्‍हणून घेतलेल्‍या परिश्रमाचे कौतुक केले.

शिक्षणाधिकारी लिलावती सरोदे यांनी प्रास्तविक केले. सहसचिव भारत घोगरे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT