अहमदनगर - राज्याचे अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या अटके विरोधात महाविकास आघाडीने अहमदनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. राज्याचे ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी अहमदनगरमधील आंदोलनात सांगितले होते की, 'आम्ही ठरवले तर भाजप नेत्यांचा कार्यक्रम होईल.' त्यावरून खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी महाविकास आघाडीच्या अहमदनगर जिल्ह्यातील नेत्यांना लक्ष्य करत टीका केली. ( Sujay Vikhe Patil said, the people will decide whose program will be ... )
अहमदनगर येथील केडगाव उपनगरात राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना जीवन उपयोगी साहित्याचे वाटप केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर मालन ढोणे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, नगरसेवक मनोज कोतकर, धनंजय जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी खासदार डॉ. विखे पाटील यांच्याशी संवाद साधला.
खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, कोणाचा कार्यक्रम होणार हे मंत्री सांगू शकत नाहीत. जनता ठरवते कोणाचा कार्यक्रम होईल. जनतेने आता ठरविले आहे. जनता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकीत त्यांचा कार्यक्रम करेल, असा इशाराही खासदार विखे पाटील यांनी दिला.
महाविकास आघाडीच्या आंदोलना बद्दल सुजय विखे पाटील म्हणाले की, त्या आंदोलनात जमलेली गर्दी ही पैसे देऊन जमविलेली गर्दी होती. जी भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात आहे ती भीती सामान्य लोकांच्या मनात असती तर जनता स्वतःहून रस्त्यावर उतरली असती. जनतेच्या मनात भीती नाही. मंत्र्यांचे भ्रष्टाचार, त्यांनी केलेली चुकीची कामे यामुळे जर त्यांना शिक्षा होणार असेल तर त्याला जनता कधी पाठिंबा देणार नाही. मी म्हणत नाही की जनता आमच्या पाठीशी आहे. देशाविरोधात काम करणाऱ्यांना साथ देणाऱ्यांबरोबर जनता कधीही राहत नाही.
ते पुढे म्हणाले, आम्ही वारंवार या गोष्टीला दुजोरा दिला आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील मुंबईला गेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर खासदार छत्रपती संभाजीराजे उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा आम्ही देतो. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. विखे पाटील कुटुंबीयांनी मराठा समाजातील मुलांना शैक्षणात सवलत देण्याचा निर्णय सर्वप्रथम घेतला. कोणत्याही मंत्र्याने पुढाकार घेऊन मराठा समाजातील मुलांना त्यांच्या शैक्षणिक संस्थांत शैक्षणिक सवलती देण्याची हिंम्मत दाखविली नाही. यातून सरकारमधील नेत्यांची मानसिकता दिसून येते, असा टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला.
ते पुढे म्हणाले, राज्य सरकारमधील मंत्र्यांना खरेतर मराठा आरक्षणासाठी वेळ नाही. त्यांचा सगळा वेळ भ्रष्टाचारात जात आहे. त्यांच्या मनात धाकधूक आहे की या पुढे काय होईल. कोणावर धाड पडेल या भीतीत ते जगत आहेत. ज्या माणसाचे चरित्र साफ आहे. त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. अशा मंत्र्यांनी तरी मराठा आरक्षणासाठी वेळ द्यावा. मराठा आरक्षणासाठी एक दिशा ठरविली गेली पाहिजे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सर्व नेते एकत्रितपणे मराठा आरक्षणाच्या मागे उभे आहोत. मात्र जी दखल महाविकास आघाडी घेतली पाहिजे. छत्रपती संभाजीराजे यांना महाविकास आघाडीने दिली आश्वासने पूर्ण झाली नसल्याने त्यांनी हा उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुद्द्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला विखे कुटुंबियांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील मुंबईला रवाना झाल्याची माहिती, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.