Solapur, 28 August : भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर पूर्व विभागानंतर शहराची 13 जणांची कोअर कमिटीही जाहीर झाली आहे. या कमिटीत तीनही आमदारांसह महापौर कोंड्याल, पालकमंत्री जयकुमार गोरे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, शहर प्रभारी योगेश टिळेकर यांचा समावेश आहे. दोन्ही देशमुखांना तब्बल 16 महिन्यांनंतर शहर भाजपच्या निर्णय प्रक्रियेत सामावून घेत मानाचे पान मिळाले आहे. त्यामुळे कोअर कमिटीच्या आगामी बैठकांना हे दोघे उपस्थित राहणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचेनुसार सरचिटणीस निरंजन डावखरे यांनी सोलापूर शहर भाजपची कोअर कमिटी जाहीर केली आहे. या कमिटीमध्ये एकूण १३ जणांना स्थान देण्यात आले आहे. मात्र निवडणुका संपल्यानंतर ही कोअर कमिटी जाहीर करण्यात आल्याने ती नेमके काय काम करणार, याची उत्सुकता आहे.
शहर भाजप कोअर कमिटीत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, शहराचे प्रभारी योगेश टिळेकर, संघटनेतील जिल्हा सरचिटणीस नारायण बनसोडे, शिवराज सरतापे आणि सुधा अळ्ळीमोरे यांनाही कोअर कमिटीत स्थान देण्यात आलेले आहे.
मंत्र्यांच्या गटातून पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार-आमदारांच्या गटातून आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख आणि देवेंद्र कोठे यांना कमिटीत स्थान देण्यात आले आहे. महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह माजी शहराध्यक्ष तथा महापालिकेतील पक्षनेते नरेंद्र काळे, तर ज्येष्ठ नेत्यांच्या गटातून जयसिद्धेश्वर महास्वामी आणि विक्रम देशमुख यांना संधी देण्यात आलेली आहे.
मागील सव्वा ते दीड वर्षापासून सोलापूर भाजपमध्ये विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे निर्णय प्रक्रियेपासून दूर असणारे मोठे नेते आहेत. सुरुवातीला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत जाऊन उभा केलेल्या पॅनेलच्या विरोधात दोन्ही देशमुखांनी एकत्र येत पॅनेल उभा केला होता. त्यात मोजक्या जागा देशमुखांच्या हाती लागल्या होत्या. पण बाजार समितीची सत्ता कल्याणशेट्टी-माने-हसापुरे गटाच्या हाती गेली होती.
त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही दोन्ही देशमुखांना डावलून निर्णय घेण्यात आले होते. आमदार सुभाश देशमुख यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर एका कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्याला डावलून राष्ट्रवादीतून आलेल्या किसन जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी सुभाष देशमुख यांनी जाहीरपणे विरोधाची भूमिका घेतली होती. त्यानंतरही त्यांचा निर्णय मान्य करण्यात आला नव्हता. तोच प्रकार विजयकुमार देशमुख यांच्याबाबत घडला होता.
पुढे महापालिका पदाधिकारी निवडीच्या वेळीही दोन्ही देशमुखांना डावलूनच निर्णय घेण्यात आले होते. आमदार सुभाष देशमुख गटाला उपमहापौरपद देण्यात आले असली तर त्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. दुसरीकडे, विजयकुमार देशमुख गटाला तर कोणतेही पद महापालिकेत मिळालेले नाही, त्यामुळे दोन्ही देशमुखांना बाजूला ठेवूनच सर्व निर्णय घेतले गेले आहेत, हे शहराला ज्ञात आहे.
देशमुख, महास्वामींवर दुहेरी जबाबदारी
आता तब्बल १६ महिन्यांनंतर सोलापूर शहर कोअर कमिटीत दोन्ही देशमुख यांना स्थान देण्यात आलेले आहे. यात सुभाष देशमुख आणि माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी या दोघांनाही पूर्व विभागाच्या जिल्हा कमिटीतही स्थान मिळालेले आहे. पूर्व विभागाबरोबच या दोघांनाही शहराच्या कोअर कमिटीत स्थान मिळाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.